
रेशन कार्डधारक शेतकरी गव्हापासून वंचित!
अकोला : जिल्ह्यातील एपीएल रेशनकार्डधारक शेतकऱ्यांना जुलै महिन्यापासून सवलतीच्या दरात करण्यात येत असलेल्या गव्हाचे वितरण बंद आहे. शेतकऱ्यांना गहू मिळावा यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने भारतीय खाद्य निगमकडे पाठपुरावा सुद्धा केला आहे. परंतु त्यानंतर सुद्धा अद्याप शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने गहू वापट करण्यासाठी गव्हाचा पुरवठा न झाल्याने शेतकऱ्यांना केवळ तांदुळाचेच वितरण करण्यात येत आहे. विषेश म्हणजे यापूर्वी सुद्धा मे व जून महिन्याच्या गव्हाचा पुरवठा शासनाने शेतकऱ्यांना केला नव्हता. परंतु त्यानंतर मे व जून महिन्यात गव्हाचे वाटप करण्यात आले.
राज्यात दुष्काळाच्या काळात १४ दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करत तीन रुपये किलो तांदूळ व दोन रुपये किलो गहू या सवलतीच्या दराने एका कुटुंबाला प्रतिमहिना जास्तीत जास्त २५ किलो धान्याचा लाभ देण्यास पात्र ठरविले होते. जिल्ह्यातील ४२ हजार ७९१ शेतकरी कुटुंबांतील एक लाख ७३ हजार ५४२ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे. शेतकरी आत्महत्या थांबवी यासाठी सदर योजना शासनाने सुरु केली आहे. त्यामुळे योजनेचा शेतकऱ्यांना दिलासा सुद्धा मिळत आहे, परंतु असे असले तरी जिल्ह्यातील शेतकरी लाभार्थ्यांना गत तीन महिन्यापासून गव्हाचे वाटप बंद आहे.
शेतकऱ्यांसाठी शासन स्तरावरून गव्हाचा पुरवठा होत नसल्याने जगाचा पोशिंदाच जुलै, ऑगस्ट पासून गव्हासाठी रेशन दुकानाच्या चकरा मारत आहे. त्यातच सप्टेंबर महिन्यात सुद्धा शासनामार्फत गहू मिळण्याची शक्यता नगण्य असल्याची माहिती आहे. त्यामुळे जगाच्या पोशिंद्यालाच गव्हापासून वंचित रहावे लागत असल्याचे दिसून येते.
अशी आहे लाभार्थी संख्या
तालुका - कार्ड - लाभार्थी
अकोला शहर- १२९८ - ५७१५
अकोला तालुका - ७७०६ - २९८३४
बार्शीटाकळी - २९८५ - ११२९६
पातूर - २७७३ - ११९२५
मूर्तिजापूर - ७७२४ - २९६२३
बाळापूर -३१०२ - १३८०३
अकोट - १०३०१ - ४४३९५
तेल्हारा - ६९०२ - २६९५१
असे मिळते धान्य
लाभार्थी शेतकऱ्यांना दोन रुपये प्रति किलोने चार किलो गव्हाचे वापट करण्यात येते. सदर वाटप प्रति व्यक्तीया हिशोबाने करण्यात येते.
लाभार्थ्यांना तीन रुपये प्रति किलो या प्रमाणे एक किलो तांदुळाचे वाटप करण्यात येते. सदर वाटप प्रतिव्यक्ती एक किलो या प्रमाणे करण्यात येते.
जुलै महिन्यापासून लाभार्थी एपीएल शेतकऱ्यांसाठी शासन स्तरावरून गव्हाचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना गव्हाचे वाटप रखडले आहे. परंतु तांदुळाचे वाटप करण्यात येत आहे.
- बी.यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला