
अकोला - पूर्णा ते अकोला दरम्यान धावणाऱ्या ०७५७४ क्रमांकाच्या गाडीत ता. २६ एप्रिल रोजी पहाटे ४.३० वाजता प्रवासादरम्यान लुटमार करणाऱ्या आरोपीला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. परभणी जिल्यातील फुलकळस येथील प्रवाशाला या आरोपींनी लुटले होते. फिर्यादी प्विण बालाजी कांबळे (वय २३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते फुलकळस, ता.पूर्णा, जि.परभणी येथील रहिवासी असून, मंगळवारी ते ट्रेन नंबर ०७५७४ यामधून पूर्णा ते अकोला असा प्रवास करत होते. मंगळ वारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास अकोला रेल्वे स्टेशनवर गाडी पोहोचली. त्यावेळी फिर्यादी व त्यांचा मित्र शिवशंकर गौतम कनकटे व अन्य एक प्रवाशी गोविंद श्यामसुंदर सारस्वत (३८) हे गाडीत झोपलेले होते. त्यावेळी आरोपी शुभम विश्वनाथ रामटेके (२२), नवनाथ एकनाथ आहेर (२५) दोघेही राहणार अकोट फैल व त्यांच्यासोबत इतर तीन विधिसंघर्षग्रस्त आरोपीने मिळून रेल्वेत लुटमार केली. फिर्यादी व इतर २ साक्षीदार यांना लाथांनी, हाताने चापटीने मारहाण करून शिवीगाळ करून त्यांच्याजवळील दोन मोबाईल, रोख ६०० रुपये जबरीने चोरून नेले. या प्रकरणी अकोला रेल्वे पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस अधीक्षक एम.राज कुमार, अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला रेल्वे पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, सहा.पोलिस निरीक्षक अर्चना गाढवे यांनी गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पथक तयार केले. अकोला लोहमार्ग पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा.पोलिस निरीक्षक अर्चना गाढवे यांनी सतिश चव्हाण, विलास पवार, अमर राठोड, नजिमुद्दीन खतिब, अन्सार खान, संजय वडगिरे, उल्हास जाधव, कपिल गवई, इरफान पठाण तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे आरक्षक राकेश कुमार शर्मा यांच्या मदतीने वेगवेगळी तपास पथके तयार करून गुन्हेगारांचा शोध घेतला. गुन्ह्यातील दोन आरोपी व तीन विधिसंघर्षग्रस्त बालक यांच्याकडून गुन्ह्यातील जबरी चोरी करून नेलेला माल हस्तगत करण्यात आला. याशिवाय आणखी एक १२ हजार रुपये किंमतीचा मोबाईल असता एकूण ३५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. गुन्ह्यातील दोन्ही आरोपीला न्यायालयाने ता. २८ एप्रिल २०२२ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. विधीसंघर्षग्रस्त बालकांना बालन्यायालया समक्ष हजर करण्यात आले. गुन्ह्याचा पुढील तपास सहा.पोलिस निरीक्षक अर्चना गाढवे या करीत आहेत.