बच्चू कडू म्हणाले...जनताच निष्काळजी, कोरोना वाढण्यास जबाबदार

मनोज भिवगडे
Wednesday, 3 June 2020

कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावासाठी अकोलेकरांचा निष्काळजीपणा जबाबदार आहे. त्यांच्या निरुत्साहामुळेच शहरात कोरोना वाढतो आहे. सर्व पक्षीय बैठकीत सर्वांच्या सहमतीने जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला होता. त्याला जनतेचा पाठिंबा नसल्याचे दिसत आहे, असे सांगून पालकमंत्री बच्चू कडू यांनी प्रशासकीय जबाबदारी झटकत कोरोना विषाणू संसर्ग वाढीसाठी अकोलेकरांवर ठपका ठेवत हात झटकले आहे.

अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावासाठी अकोलेकरांचा निष्काळजीपणा जबाबदार आहे. त्यांच्या निरुत्साहामुळेच शहरात कोरोना वाढतो आहे. सर्व पक्षीय बैठकीत सर्वांच्या सहमतीने जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला होता. त्याला जनतेचा पाठिंबा नसल्याचे दिसत आहे, असे सांगून पालकमंत्री बच्चू कडू यांनी प्रशासकीय जबाबदारी झटकत कोरोना विषाणू संसर्ग वाढीसाठी अकोलेकरांवर ठपका ठेवत हात झटकले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे 1 ते 6 जून या कालावधीत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्यासंदर्भात पालकमंत्री बच्चू कडू व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आवाहन केले होते. परंतु सदर कर्फ्यूला नागरिकांनीच नाकारल्यामुळे 4 ते 6 जूनपर्यंतचा कर्फ्यू रद्द करण्याची नामुष्की पालकमंत्री व जिल्हा प्रशासनावर ओढवली आहे.

जनात कर्फ्यू मागे घेत असल्याचे पत्र पालकमंत्र्यांनी मंगळवारी त्यांच्या स्वाक्षरीसह प्रसिद्धीस दिले. त्यात त्यांनी कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी पालकमंत्री म्हणून करीत असलेल्या कामाचे गुणगाण करीत प्रशासनाचे कौतुक केले. मात्र त्याच वेळी त्यांनी कोरोना वाढीसाठी अकोलेकरांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा ठपकाही या पत्रात ठेवला आहे. आगामी काही दिवसांमध्ये पावसाळ्याला सुरुवात होत असून या ऋतुमध्ये साथीचे रोग सुद्धा डोके काढतात. अशा प्रसंगी कोरोना विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिबंध करणे अवघड होईल. त्यामुळे 28 मे रोजी झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत शहराच्या हितासाठी कोरोनावर प्रतिबंध म्हणून 1 ते 6 जून या कालावधीत जनता कर्फ्यूची अंमलबजावणी झाल्यास हितकारक ठरेल यावर सर्वांचे एकमत झाले होते.

या कालावधीत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन लोकप्रतिनिधींनी शहरातील जनतेला केले होते. त्याला नागरिकांनी नाकारले. जनतेचे सहकार्य मिळाले असते तर निश्‍चितच कोरोना संसर्ग टाळण्यास मदत झाली असते. मात्र नागरिकांचे सहकार्य मिळाल्याचे दिसत नाही. त्यामुळे जनता कर्फ्यू मागे घेत असल्याचे पालकमंत्र्यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bacchu kadu said public is negligent, responsible for the growth of corona