

Barshitakli Kharif Crop Loss
esakal
बार्शीटाकळी : भर पावसाळ्यात आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याच्या पदरी यंदा पावसाऐवजी चिंता आली आहे. पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने बार्शीटाकळी तालुक्यात खरीप अक्षरशः हातातून निसटला असून, रब्बीही संकटात सापडला आहे. शेतात उभे पीक करपले, उत्पादनाची आशा मावळली आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. खरिपासाठी बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत आणि मजुरीसाठी खर्च करून शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पिके उभी केली. मात्र पावसाने साथ सोडल्याने अनेक भागांतील पिकांची अवस्था बिकट झाली आहे. विशेषतः सोयाबीन, मूग आणि उडदाचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. कपाशी व तूर पिकांवरही पावसाअभावी विपरित परिणाम झाला आहे. सरसकट मदतीची शेतकऱ्यांची हाक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. केवळ कागदावरील आकडेवारी न पाहता शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून मदतीचे निकष ठरवावेत, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.पंचनाम्यांचे आदेश मिळाले; आता मदतीची प्रतीक्षा आहे.
"तालुक्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांची संयुक्त समिती नियुक्त करण्यात आली आहे. संबंधित समितीमार्फत गावनिहाय व पिकनिहाय प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीची टक्केवारी निश्चित करण्याच्या अनुषंगाने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंचनाम्यांमध्ये प्रत्यक्ष शेतातील पिकांची स्थिती, नुकसानग्रस्त क्षेत्र व नुकसानीची टक्केवारी यांची वस्तुनिष्ठ नोंद घेण्यात येईल. प्राप्त अहवालानुसार पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल."
- रविंद्र कापशीकर, तहसीलदार, बार्शीटाकळी
"आभाळाकडे आशेने पाहत पेरलेली स्वप्ने पावसाने अक्षरशः करपवून टाकली आहेत. शेतात उभे पीक डोळ्यांसमोर सुकत आहे आणि त्याचवेळी डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. जमिनीत ओलावा नसल्याने रब्बीची आशाही मावळताना दिसत आहे. वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा आणि घेतलेले कर्ज कसे फेडायचे, हा प्रश्न आता प्रत्येक शेतकऱ्याला छळत आहे. पंचनामे प्रत्यक्ष शेतात जाऊन प्रामाणिकपणे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी. आज आम्हाला आश्वासन नव्हे, तर संकटातून उभे राहण्यासाठी ठोस आर्थिक आधार हवा आहे."
- ज्ञानेश्वर ढोरे, कृषिरत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी, महागाव
महसूल, कृषी व ग्रामविकास यंत्रणा शेतबांधावर दरम्यान, निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल घेत महसूल प्रशासनाकडून तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांची संयुक्त समिती नेमून पिकनिहाय पाहणी व पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. संबंधित पथकांना पिकांची स्थिती पाहून नुकसानीची टक्केवारी निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या पंचनाम्यांमधून प्रत्यक्ष नुकसान किती झाले, याची वस्तुनिष्ठ नोंद होणे अपेक्षित आहे. त्यामुळे पंचनामे करताना प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून पारदर्शकपणे नुकसान नोंदविण्याची गरज आहे.
चारा-पाण्याचे संकटही उंबरठ्यावर पावसाची स्थिती अशीच राहिल्यास आगामी काळात केवळ पिकांचेच नव्हे, तर गुरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. खरीप उत्पादन घटल्याने शेतातील कडबा-चाऱ्याची उपलब्धता कमी होण्याची शक्यता असून, भविष्यात पशुधन सांभाळण्याचे आव्हानही उभे राहू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.