esakal | महानगरपालिकेत पुन्हा ‘रणकंदन’, शिवसेना गटनेत्यांनी लोटले टेबल
sakal

बोलून बातमी शोधा

Battle again in Akola Municipal Corporation, Shiv Sena group leaders turned the table

महानगरपालिकेत सत्ताधारी भाजप व शिवसेना यांच्यात भूमिगट गटार योजनेवरून सुरू असलेल्या वादातून पुन्हा एकदा स्थायी समिती सभेत रणकंदन घडले. मतदानाचा आग्रह फेटाळल्याने शिवसेना गटनेते राजेश मिश्रा यांनी टेबल लोटलल्याने सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते.

महानगरपालिकेत पुन्हा ‘रणकंदन’, शिवसेना गटनेत्यांनी लोटले टेबल

sakal_logo
By
मनोज भिवगडे

अकोला :महानगरपालिकेत सत्ताधारी भाजप व शिवसेना यांच्यात भूमिगट गटार योजनेवरून सुरू असलेल्या वादातून पुन्हा एकदा स्थायी समिती सभेत रणकंदन घडले. मतदानाचा आग्रह फेटाळल्याने शिवसेना गटनेते राजेश मिश्रा यांनी टेबल लोटलल्याने सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते.


अकोला महानगरपालिका स्थायी समितीची सभा बुधवारी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली होती. या सभेत विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर विषय सूचीवरील भूमिगट गटार योजनेच्या विषयावर चर्चा सुरू झाली.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यावेळी शिवसेनेने हा विषय मंजूर करण्यापूर्वी मतदानाचा आग्रह धरला. त्यानुसार सभापती सतिष ढगे यांनी पीकेव्ही येथील ७ एमएलडी एसटीपी व वेटवेल पंपिंग स्टेशनकरिता एक्स्प्रेस फिडरद्वारे उच्च दाब विद्युत पुरवठा घेण्याची निविदा मंजूर करण्याच्या विषयावर मतदान घेतले. त्यानंत भूमिगट स्काडा ॲटोमेशन बसविण्यासाठी पाणीपुरवठ्यासाठी बिलिंग, मिटर रिडिंग, डाटा एन्‍ट्री आदींसाठीची निविदा मंजुरीचा विषय चर्चेला आला.

या दोन्ही विषयावरही मतदान घेण्याचा आग्रह शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा यांनी घेतला. एकदा मतदान घेतल्यानंतर परतपरत मतदान घेण्यास सभापती ढगे यांनी विरोध केला. त्यामुळे सत्ताधारी भाजप व शिवसेनेतील वाद पुन्हा सभेत उफाळून आला. वादळी चर्चा सुरू असतानाच मिश्रा यांनी त्यांच्यापुढील टेबल ढकलून पाडला व सभापतींच्या पुढे जाऊन वाद घालण्यास सुरुवात केली. अखेर या वादळी चर्चेतच विषय सूचीवरील विषय मंजूर करण्यात आले.

सायकल खरेदीचा अहवाल १५ दिवसांत
महिला व बालकल्याण विभागामार्फत विद्यार्थिनींकरिता सायकल खरेदी करताना मुख्याध्यापकांनी खोटी देयके सादर केल्याचे प्रकरण स्थायी समितीपुढे चर्चेला आले. शिवसेना नगरसेवक राजेश मिश्रा आणि शशिकांत चोपडे यांनी याबाबत कारवाईची मागणी केली. त्यावर सहायक आयुक्त पूनम कळंबे यांनी या विषयाची चौकशी सुरू असल्याचे सांगून १५ दिवसांत अहवाल मनपा आयुक्तांना सादर केला जाणार असल्याचे सांगितले.

अतिक्रमणाची चौकशी करण्याचे निर्देश
शिवनी परिसरात सरकारी जागेवर होत असलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेविका किरण बोराखडे यांनी उपस्थित केला. मनपाचे अधिकारी व काही व्यक्ती मिळून या जागा विकत असून, त्यासाठी आर्थिक देवाणघेवाण सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. काही जागांसाठी कर आकारणीचे प्रस्ताव मनपा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहे. त्यानुसार शहरातील सर्वच अशा अतिक्रमणीत जागांची चौकशी करण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती सतिश ढगे यांनी दिले. या मुद्यावर भाजपच्या नगरसेविकांनी विरोधी भूमिका घेण्याचा प्रयत्न केल्याने शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा यांनी सत्ताधाऱ्यांवर चुकीच्या बाबींची पाठराखण करीत असल्याचा आरोप केला.
(संपादन - विवेक मेतकर)