साडेपाचशे मंदिरात शनिवारी होणार घंटानाद

मनोज भिवगडे
Thursday, 27 August 2020

गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना संकटामुळे राज्यातील भाविक मानसिकदृष्ट्या खचलेले आहेत. त्यांना आपल्या आराध्य देवतेचे भजन, पूजन, कीर्तन आणि दर्शन करुन मानसिक आधार मिळणे अपरिहार्य आहे. केंद्र शासनाने देवस्थाने सुरू करण्याबाबत ४ जून रोजी नियमावलीसह परिपत्रक जारी केले आहे;

अकोला  :  कोरोना संकटात बंद असलेली मंदिरे दर्शनासाठी उघडी करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने शनिवार, ता. २९ ऑगस्ट २०२० रोजी अकोला जिल्ह्यातील ५५० मंदिरांमध्ये घंटानाद करण्यात येणार आहे.

गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना संकटामुळे राज्यातील भाविक मानसिकदृष्ट्या खचलेले आहेत. त्यांना आपल्या आराध्य देवतेचे भजन, पूजन, कीर्तन आणि दर्शन करुन मानसिक आधार मिळणे अपरिहार्य आहे. केंद्र शासनाने देवस्थाने सुरू करण्याबाबत ४ जून रोजी नियमावलीसह परिपत्रक जारी केले आहे; त्यानुसार देशभरातील बहुसंख्य व प्रमुख देवस्थाने सुरू देखील करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही देवस्थाने सुरू करण्याची अनेक व्यक्ती तसेच संघटनांनी महाराष्ट्र सरकारकडे खूप वेळा मागणी केली. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात मॉल, मांस, मदिरा सुरू झाले आणि देवस्थाने मात्र बंद आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

राजस्थान, महाराष्ट्र व काँग्रेस शाषित राज्यात धार्मिक स्थळे अद्यापही दर्शनासाठी बंद आहेत. या संदर्भात राज्यभरात भाजप अध्यात्म आघाडीतर्फे २९ ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. धार्मिक स्थळांसमोर असलेले दुकानदार व मंदिर संस्थानांची कोविड-१९ काळात भक्त न आल्यामुळे आर्थिक परिस्थिती वाईट झाली.

त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. भाजपच्या वतीने राज्यपाल, मुख्यमंत्री यांना वारंवार विनंती केल्यावर सुद्धा व देशभरात आटी व शर्तीवर धार्मिक स्थळे सुरू असताना महाराष्ट्रात मात्र मंदिरातील देव कुलूप बंद करून ठेवण्यात आले आहे.

त्यामुळे भाजप अध्यात्म आघाडीवतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता घंटानाद करून सरकारचा निषेध नोंदवण्याचे आवाहन सर्व मंदिराच्या ट्रस्टी, पुजारी व भाविकांना रामनवमी शोभा यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The bell will ring in 550 temples in Akola district on Saturday