अकोला : कारंजात प्रॉपर्टी विक्रीचा गोरखधंदा

थोडी रिस्क, भरपूर कमाईचा फंडा; प्रलोभनात ग्राहकांचा बळी
अकोला : कारंजात प्रॉपर्टी विक्रीचा गोरखधंदा
अकोला : कारंजात प्रॉपर्टी विक्रीचा गोरखधंदा

अकोला : आजच्या युगात महागाईने उच्चांक गाठल्याने जो तो पैशाच्या मागे लागला आहे. हा पैसा कमविण्यासाठी काहींनी प्रॉपर्टी व्यवसायात उडी घेऊन ''थोडी रिस्क, भरपूर कमाईचा फंडा'' या बिरुदावली प्रमाणे आपली तिजोरी भरणे सुरु केले असल्याने कारंजा शहरात प्लॉट, फ्लॅट अन दुकान विक्रीच्या गोरखधंद्याला उधाण आले आहे.

धनदांडग्यांचा कमी खर्चात मोठा नफा कमवून देण्याचा हा धंदाच बनला आहे. शिवाय, मध्यम वर्गीयांची गरज लक्षात घेता रेडिमेड घर, प्लॉट, फ्लॅट खरेदीसाठी ग्राहकांना विविध योजनांच्या माध्यमातून प्रलोभने देऊन ग्राहकांच्या माथी अव्वाच्या सव्वा भावात प्रॉपर्टी मारण्याचे काम जोमात सुरु आहे.

कारंजा तालुक्यातून समृद्धी महामार्ग गेल्याने कारंजा ते नागपूर पासून कोठेच या मार्गांवर थांबा नसून तो फक्त कारंजा येथेच आहे. शिवाय, हा मार्ग सामान्य मार्गापेक्षा उंच असल्याने यावर कारंजा येथूनच चढता येण्याची सुविधा असल्याने या ठिकाणी मोठं-मोठ्या कंपन्या बस्तान मांडणार आहे. त्यामुळे, व्यापारी दृष्टिकोनातून शहर मोठ्या शहरांशी जोडल्या जाऊन व्यापार वृद्धिंगत होणार आहे.

सोबतच, कारंजा येथे स्मार्ट सिटी वसणार असून हैद्राबाद महामार्ग, हवाई अड्डा कारंजात येणार असल्याने रेडिमेड घरांची, फ्लॅटची गरज बाहेर गावातील लोकांना भासणार आहे. त्यामुळे, जागेच्या किंमतीसुद्धा उच्चांक गाठणार असल्याच्या चर्चेची पेरणी भूखंड, रेडिमेड घर, फ्लॅट व्यावसायिक ताकदीनिशी संपूर्ण कारंजा तालुक्यात करीत आहे. त्यामुळे, कारंजावासी सुद्धा गुंतवणुकीच्या अनुषंगाने शिवाय घर भाडेतत्त्वावर देणे हेतूने पैशांची तडजोड करुन कर्ज काढून रेडिमेड घर, फ्लॅट, प्लॉट, दुकान विकत घेत असल्याचे चित्र कारंजा शहरात सध्या पाहावयास मिळत आहे

मंजुरी मिळण्याआधीच प्लॉटची विक्री

शेती अकृषक केल्यानंतर त्यामध्ये, ले-आउट पाडण्यासाठी टाऊन प्लँनिंग विभागाची परवानगी घ्यावी लागते. परवानगीचा निकष पार पाडल्यानंतरच प्लॉट विकावे लागते. मात्र, शहरात परवानगी मिळण्याआधीच व्यावसायिक प्लॉट विकायला सुरुवात करतात. त्यानंतर, त्या ले-आउटमध्ये त्रुटी आल्यास त्याचा फटका भोगवटदारांना सहन करावा लागतो. त्यामुळे, संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता प्लॉट मालकाने केली असेल तरचं नवीन प्लॉट, फ्लॅट, रेडिमेड घर तसेच दुकानांची खरेदी करावी. असे, मत जुनी-जाणती मंडळी व्यक्त करीत आहे.

प्रलोभनाचे बळी पडलेल्यांची कचेरीत ससेहोलपट

एक दशकापूर्वी कारंजा शहरात प्रॉपर्टी व्यवसायाला हवा तसा भाव मिळत नव्हता. मात्र, जसं-जसे दिवस गेले तस-तसे या व्यवसायाला सुगीचे दिवस यायला लागले. त्याकाळी शहरातील काही मंडळींनी गुंतवणुकीच्या अनुषंगाने प्लॉटची खरेदी करतांना कुठल्याही प्रकारची काळजी न घेतल्याने डोळेझाकपणे व्यावसायिकांवर विश्वास ठेऊन कागदपत्रांची शहानिशा केली नसल्याने कारंजातील काही सुज्ञ नागरिक आजही आपल्याला न्याय मिळावा म्हणून, कचेरीचे हेलपाटे मारत असल्याचे दृष्टीस पडत आहे.

भाऊ, फ्रंटची बुकिंग झाली

कारंजा शहरात नवीन ले-आउट पडल्यास अवघ्या काही तासात त्या ले-आउट बाबत एखाद्या नवख्या ग्राहकाने विचारणा केल्यास आपल्याला कुठला हवा याची माहिती दलाल वर्ग काढून घेतात. त्या ग्राहकाने फ्रंटचे भाव विचारल्यास त्याला ''भाऊ फ्रंटचे गेले फक्त मागचे एक-दोन राहिले'' असे सांगितले जाते. त्यामुळे, ग्राहक सुद्धा तडकाफडकी निर्णय घेऊन अव्वाच्या सव्वा भावात खरेदी करतांना दृष्टीस पडतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com