
विठ्ठला! त्या भाविकांसाठी पंढरपूरचे दर्शन ठरले अखेरचे
खामगाव (जि. बुलडाणा) : अकोला शहरानजीक असलेल्या कौलखेड येथील भाविक मंगळवारी (ता. २६) विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात होते. मात्र, खामगाव ते चिखली महामार्गावरील वैरागडनजीक काळाने त्यांच्यावर झडप घातली. या भीषण अपघातात ९ पैकी ५ भाविकांचा मृत्यू झाला. त्यामुळे या भाविकांसाठी हे शेवटचे देवदर्शन ठरले.
प्राप्त माहितीनुसार, कौलखेड येथील एकाच कुटुंबातील ९ जण पंढरपूरला दर्शनासाठी कारने निघाले होते. खामगाव सोडल्यानंतर उंद्रीनजीक सह्याद्री हॉटेलजवळ त्यांच्या कारला समोरून येणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत विश्वनाथ पिराजी कराळ (वय ७२), बाळकृष्ण खर्चे (वय ७०), श्यामसुंदर रोकडे (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला तर शकुंतला विश्वनाथ कराळ (वय ६२) यांचा खामगाव सामान्य रुग्णालयात तर सुलोचना रोहनकार यांचा अकोल्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जखमी मुरलीधर रोहनकार, उषा ठाकरे, श्यामराव ठाकरे यांना आधी खामगाव व नंतर अकोल्याला खासगी रुग्णालयात हालविण्यात आले. अलका खर्चे यांच्यावर खामगाव येथे उपचार करण्यात येत आहे. अपघात घडल्यानंतर भाविकांच्या टाटा सुमोमागे असलेली महावितरणची खासगी करारावरील बोलेरो जीप गाडीला धडकली. दोन्ही बोलेरो वाहनातील व्यक्ती अपघातानंतर पसार झाले. याप्रकरणी अमडापूर पोलिस स्टेशनमध्ये कारवाई करण्यात येणार असल्याचे कळते.
ट्रक व टिप्पर अपघातात एकाचा मृत्यू
देऊळगावराजा : भरधाव ट्रक व मुरमाचे टिप्पर समोरासमोर धडकून झालेल्या भीषण अपघातात टिप्पर चालक जागीच ठार तर ट्रक चालकाचा सोवती गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी देऊळगाव राजा ते चिखली मार्गावर असोला फाट्यानजीक घडली. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहने छिन्नविच्छिन्न झाले. अडकलेल्या मृत व जखमी वाहनचालकांना बाहेर काढण्यासाठी जेसीबी बोलवावी लागली.