स्वातंत्र्य सेनानी कन्हैयालाल लढ्ढा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेनानी कन्हैयालाल

स्वातंत्र्य सेनानी कन्हैयालाल लढ्ढा

आज संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहे. स्वातंत्र्य मिळावे याकरिता अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली तर काहींनी तुरुंगवास भोगला यापैकीच व्याड येथील स्व. कन्हैयालाल रामगोपाल लढ्ढा यांचा जन्म व्याड येथील शेतकरी कुटुंबात १९०० मध्ये झाला तर मृत्यू २६ फेब्रुवारी १९८४ रोजी झाला. त्यांनी वयाच्या २२ व्या वर्षी गांधीजींच्या विचाराने प्रेरित होऊन स्वातंत्र्य चळवळीत वाहून घेतले. व्याड येथे गुरुकुलची स्थापना करून स्वातंत्र्याची ज्योत पेटवली.

१९३० मध्ये मिठाच्या सत्याग्रहामध्ये विदर्भ केसरी ब्रिजलाल बियाणी व किसनलालजी गोयंनका यांच्यासोबत उडी घेतली. १९३१ मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व विदर्भ काँग्रेस कमिटीचे सक्रिय सदस्य होऊन प्रादेशिक काँग्रेस कमिटीचे अधिवेशन व्याड येथे घेतले व स्वदेशी वस्तू चळवळीची सुरुवात केली. लाकडी चरखे बनवून लोकांना जागृत करून स्वदेशी वस्तू बाबत प्रेरित केले त्यावेळी व्याड हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाऊ लागले.

१९४० मध्ये त्यांनी व्याड येथे गुरुकुल कॅम्पची स्थापना केली. देशभक्त वामनरावजी जोशी यांच्या हस्ते व ब्रिजलाल बियाणी, किसनलालजी गोयंनका, देशभक्त गंगाराम सिकची यांना सोबत घेऊन गुरुकुल उद्योग मंदिराचे भूमिपूजन केले. स्वखर्चाने शेतामध्ये तीन इमारती उभारल्या व स्वातंत्र्य सैनिकांना प्रशिक्षण व राहण्याची व्यवस्था केली.

त्याच ठिकाणी त्यांनी खादी, सतरंज्या, गालीचे, रंग, लाकडी सामान, साबण, तेल, लोखंडी वस्तू,चांबड्यापासून, माती पासून वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले. सोबतच आत्मरक्षणाचे व स्वातंत्र्य चळवळीचे प्रशिक्षणही दिले. विदर्भातील पहिल्या स्वदेशी वस्तू बनविण्याची प्रशिक्षण केंद्र गुरुकुल उद्योग मंदिरास श्री एम वाय शरीफ, श्री पंडित रविशंकर शुक्ला, श्री शंकरराव देव, श्री घनश्यामसिंग गुप्ता, श्री ना ब्रिजदारजी बियाणी, श्रीराम कृष्णजी धूत, राजलक्ष्मी निवासजी, विनायकराव कोरटकर, पंडित काशिनाथ वैद्य, हैदराबादचे स्वामी रामानंदजीतीर्थ, सुगनचंदजी लुनावत, डॉक्टर खेडकर, संत अडकोजी महाराज, संत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांनी भेटी देऊन स्वदेशी कार्याच्या कामाबद्दल प्रोत्साहित केले.

त्याकाळी गुरुकुलमधील प्रशिक्षित मुलांना औद्योगिक प्रशिक्षणासाठी जपान येथे पाठविले जात होते. स्वदेशी वस्तूच्या चळवळीत सत्याग्रहांमध्ये सहभागामुळे इंग्रज सरकारने त्यांना व ना ब्रिजलाल बियाणी व त्यांच्या इतर सहकाऱ्यांना दिनांक नऊ ऑगस्ट १९४३ ते दिनांक २३ ऑगस्ट १९४३ पर्यंत अकोला येथे कारागृहात ठेवले होते. कारागृहातून आल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य लढ्याचे आंदोलन अधिक तीव्र केले व १९४५ मध्ये अमरावती येथे जाऊन त्यांनी तेथील देशभक्त गंगाबिसन सिकची यांच्यासोबत इंग्रजांच्या कार्यालयावर भारताचा ध्वज फडकविला. ध्वज फडकविल्यानंतर खाली उतरत असताना इंग्रज सैनिकांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यामध्ये त्यांच्या उजव्या पायाच्या मांडीला तीन गोळ्या लागल्या. ते बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना ४५ दिवस कारागृहामध्ये ठेवले होते.

व्याड हे गाव विदर्भ व निजाम स्टेटच्या सरहद्दीवर आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४८ मध्ये हैदराबाद निजाम स्टेट विलिनीकरणाच्या लढ्यात १२० भारतीय सैनिकाची तुकडी त्यांनी गुरुकुल उद्योग भवनाच्या इमारतीमध्ये ६५ दिवस ठेवली होती. त्यांनी सैनिक दलास स्वतः रसद पुरविली. त्यासाठी त्यांना जिल्हा पोलीस दलाच्या अधिकाऱ्याकडून गौरवुन सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्याच्या २५ व्या वर्धापन दिनाच्या महोत्सवात त्यांना १५ ऑगस्ट १९७२ रोजी जिल्हाधिकारी अकोला यांनी आमंत्रित करून सन्मानित केले होते .