esakal | मिरचीला मातीमोल भाव, तोडणीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी अडचणीत
sakal

बोलून बातमी शोधा

मिरची

मिरचीला मातीमोल भाव, तोडणीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी अडचणीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदुरा (जि. बुलडणा) : कॉटन बेल्ट परिसरात गेल्या काही वर्षांपासून बोंडअळीचे आक्रमण वाढल्याने शेतकऱ्यांनी इतर पिकांकडे मोर्चा वळविला आहे. यंदा अनेकांनी मिरचीला (chili rate buldana) प्राधान्य दिले असताना मिरचीला मातीमोल भाव मिळत आहे. सध्या शेतकऱ्यांकडून पाच ते सात रुपये किलोप्रमाणे मिरचीची खरेदी केली जात आहे. यात तोडणीचा खर्चही निघत नाही. याशिवाय रोगराईचा मोठा तडाखा बसल्याने शेतकरी हवालदिल आहेत.

हेही वाचा: शिवसेना संपर्क प्रमुखांचे पंख छाटले; घ्यावी लागणार चौघांची संमती

एकेकाळी नांदुरा मार्केट मिरचीसाठी प्रसिद्ध होते. कालांतराने सुधारित कपाशीचे वाण बाजारात आल्याने येथील शेतकऱ्यांनी कपाशीला प्राधान्य देत कॉटन बेल्टची किनार जोडली. मात्र, गेल्या चार-पाच वर्षात याच कपाशीवर बोंडअळीचे मोठ्या प्रमाणात आक्रमण होत गेल्याने येथील शेतकऱ्यांनी इतर पिके घेण्यास सुरुवात केली. यावर्षी अनेकांनी बागायतीमधून वेगवेगळ्या मिरची वाणाची पावसाळ्यापूर्वी पेरणी केली. आता ही मिरची बाजारात आली. सुरुवातीला ४० ते ५० रुपये प्रतिकिलोने मिरचीची विक्रीही झाली. मात्र, आता सर्वच भाजीपाल्यासोबत मिरचीची आवक वाढल्याने भावात अचानक घसरण झाली. अनियमित आणि कमी पावसामुळे यंदा सर्वच पिकांवर किडीचा प्रादूर्भाव दिसून येतो. मिरची पिकाचेही तेच झाले. सुरुवातीला मररोग, नंतर कोकडासोबतच मावा येत गेल्याने या पिकांची वाढ खुंटली व आवक कमी झाल्याने भावात तेजी आली. सध्या रोगराई तर आहेच; पण दर कोसळल्याने मिरची तोडणे परवडणारे नाही. तीच परिस्थिती वांगे व इतर पिकांची आहे. उत्पादन खर्च सुरूच; मात्र भावात मंदी असल्‍याचे चित्र निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्या रिमझिम पावसामुळे बुरशीजन्य आजार व फळ पोखरणाऱ्या अळीमुळे शेतकरी त्रस्त आहेत. महागड्या कीटकनाशकांचा परिणाम जाणवत नसल्याने शेतकरी चिंतित आहेत.

मातीमोल भावात विकावा लागतो माल -

पावसाळ्यापूर्वी किंवा भर पावसाळ्यात मिरचीची लागवड केली जाते. त्यासाठी रासायनिक खते, कीटकनाशके व मजुरीचा मोठा खर्च पडतो. सुरुवातीला ही मिरची ३५०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल विकली गेली. परंतु, सध्या भावात घसरण झाल्याने उत्पादन खर्च निघणेसुद्धा कठीण आहे. वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी करून शेतकऱ्यांनी कसेबसे मिरची पिकाला जगविले. मिरचीचे उत्पादन निघायला सुरुवात झाली. परंतु भावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना मातीमोल भावात माल विकावा लागत आहे. पुढेही असेच भाव राहिले तर यंदा मिरची पीक धोक्याचेच ठरेल, अशी भावना शेतकरी बोलून दाखवत आहेत.

loading image
go to top