एमपीडीए कायद्यांतर्गंत कारवाईचा श्रीगणेशा

भगवान वानखेडे 
Thursday, 6 August 2020

सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत  कारवाई ः विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कसली कंबर

अकोला ः  वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशान्वये  सिटी कोतवाली पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड (एमपीडीए) कायद्यांतर्गंत शहरातील साहेब खा अहमद खा (वय 25, रा. नवीन बैदपुरा) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या वर्षातील ही एकमेव कारवाई आहे. या कारवाईमुळे एमपीडीए कायद्यांतर्गंत कारवाईचा श्रीगणेशा झाला आहे.

शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणार्‍या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व त्यांची गुन्हेगारी रोखण्यासाठी अकोला पोलिसांकडून कडक प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला आहे. अशातच 15 जून रोजी मध्यरात्री दोन वाजता गुंड साहेब खा अहमद खा याने त्याच्या साथीदारासह मो. ईजान मो. माहीद याला वस्तऱ्याचा धाक दाखवून त्यांच्याजवळील मोबाइल हिसकावून जीवे मारण्याची धमकी देऊन पळून गेला होता. या आरोपी पोलिसांनी 392, 34 अन्वये कारवाई करून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर त्याच्यावर असलेल्या गुन्ह्याचा आढावा घेत ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत वाघुंडे , शहर उपविभागीय अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उत्तम जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. 

गुंडावर डझन गुन्हे दाखल
एमपीडीए अंतर्गंत कारवाई करण्यात आलेल्या साहेब खा अहमद खा  याच्यावर रामदासपेठ, डाबकी रोड पोलिस ठाण्यातर्गंत खंडणी, लुटमार, शिविगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, यासह इतर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या या विघातक कृत्यामुळे त्याची शहरात दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे त्याच्या गुन्ह्याचा आलेख तख शहरात वाढत असलेली दादागिरी, गुंडगिरी बघून त्याच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. 

काय आहे एमपीडीए कायदा?
महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृक्श्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणार्‍या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 म्हणजेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिविटी) होय. सराईत गुन्हेगार किंवा सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणार्‍या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध एमपीडीएची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते. परंतु कारवाईनंतर त्याला पोलिस आयुक्त, उच्च न्यायालय किंवा अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांच्याकडे अपील करता येते.

भूमाफिया, वाळू तस्कर पोलिसांच्या रडारवर
गुन्हेगारीला आळा घालण्यासोबतच आता अकोला पोलिसांच्या रडारवर शहर आणि जिल्ह्यातील भूमाफिया, वाळू तस्कर यासोबतच झोपडपट्टीतील गुंडर रडारवर असून, पुढील काही दिवसांत अशांवर कारवाई केली जाणार असल्याची विश्वसनिय सूत्रांची माहिती आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commencement of action under MPDA Act