कोरोना बाधितांना दिलासा; आणखी सहा ऑक्सिजन प्लांटची निर्मिती! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑक्सिजन सिलेंडर

कोरोना बाधितांना दिलासा; आणखी सहा ऑक्सिजन प्लांटची निर्मिती!

अकोला ः कोरोनाग्रस्तांना कृत्रिम ऑक्सिजनची (Artificial oxygen) सतत गरज भासत असल्याने जिल्ह्यात नव्याने सहा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहेत. ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी, बाळापूर, अकोट व तेल्हारा येथे प्रत्येकी एक-एक तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College) तथा सर्वोपचार रुग्णालय येथे दोन अशा सहा ऑक्सिजन प्लांटची नव्याने निर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच जिल्ह्यात तीन ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित झाल्याने आता त्यात नव्या सहा प्लांटची भर पडणार असून, यानंतर कोरोनाबाधितांना भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळेल, असे अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. Construction of six more oxygen plants at Akola!

ऑक्सिजनची कमतरता हे कोरोना रुग्णांमधील एक प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे अति जोखिमग्रस्त रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांना कृत्रीम ऑक्सिजन द्यावे लागते. जिल्ह्यात कोरोनाचा वेग अधिक असताना ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात बहुतांश रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजन द्यावे लागले. परिणामी जिल्ह्यात ऑक्सिजन कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे बहुतांश ऑक्सिजनचे सिलिंडर कोरोनाग्रस्तांसाठीच आरक्षित ठेवावे लागत होते.

सदर स्थितीतून जिल्ह्याची सुटका व्हावी व रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळावे यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून सर्वोपचार रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालयासाठी दोन ऑक्सिजन प्लांट मंजूर केले होते. त्यासाठी ४७ लाख ९९ हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

सदर दोन्ही प्लांटची नोव्हेंबर महिन्यात उभारणी करण्यात आली. त्यानंतर ते सुरू सुद्धा झाले. परंतु कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी जिल्ह्यात पुन्हा सहा ऑक्सीजन प्लांट उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी चार प्लांट ग्रामीण रुग्णालयात तर दोन प्लांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उभारण्यात येणार आहेत.

संपादन - विवेक मेतकर

Construction of six more oxygen plants at Akola!

टॅग्स :Akola