esakal | देवानंदचा १३५ दिवस मृत्यूशी संघर्ष; धोका टळलेला नाही
sakal

बोलून बातमी शोधा

देवानंदचा १३५ दिवस मृत्यूशी संघर्ष; धोका टळलेला नाही

देवानंदचा १३५ दिवस मृत्यूशी संघर्ष; धोका टळलेला नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तेल्हारा (जि. अकोला) : यूपीएससीत दोनदा मुलाखतीसाठी पात्र झालेला अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथील उच्चशिक्षित देवानंद सुरेश तेलगोटे याने कोरोनाची लागण झाल्यानंतर सलग १३५ दिवशी मृत्यूशी संघर्ष केला. तो सुखरूप बरा झाला असून, रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह हजारोंच्या प्रार्थनेला यश मिळाले असले तरी त्याचा संघर्ष मात्र अद्याप संपलेला नाही.

मुंबई येथे आयआयटी झालेल्या देवानंदला कोरोना संसर्गाची लागण झाली होती. त्यातून गुंतागुंत वाढली. त्याला हैदराबाद येथे उपचारासाठी दाखल केले. तेथून तब्बल १३५ दिवस कोरोनाशी संघर्ष केल्यानंतर तो रुग्णालयातून सुखरूप घरी परतला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर २८ एप्रिल २०२१ रोजी अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा: देशात महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे राज्य; पण कशात वाचा...

त्यांची प्रकृती खालावत असल्याने डॉक्टरांनी ईसीएमओ थेअरपीची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यामुळे पुढील होणारा खर्च हा प्रचंड असल्याने मित्र परिवारानी मदतीचा हात पुढे केला आणि १५ मे रोजी देवानंदला एअर ॲम्बुलन्सने अकोला येथून हैदराबादला केम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हैदराबादचे पोलिस अधीक्षक महेश भागवत यांनी त्याची व कुटुंबीयांची मदत केली.

९ जूनला देवानंदला हृदयविकाराचा झटका आला. तो दिवस कुटुंबीय, मित्र परिवारासाठी वेदनादायक होता. दोन तासांच्या आत १५ रक्तदाते महेश भागवत आणि हेल्पिंग हॅंड्स या ग्रुपच्या माध्यमातून पुढे सरसावले. परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढे उपचाराला प्रतिसाद मिळाल्याने देवानंदची प्रकृती सुधारत गेली. ९ सप्टेंबरला त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. मात्र, पुढील उपचारासाठी तो हैदराबाद येथे भाड्याने घेतलेल्या फ्लॅटवर मुक्कामी आहे.

देवानंदची रुग्णालयातून सुट्टी झाली असली तरी धोका टळला नाही, असे मत अकोला येथील प्रसिद्ध फुप्फुस तज्ञ डॉ. सतीश गुप्ता, हैदराबाद येथील डॉ. संदीप अत्तवार, डॉ. भास्करराव, डॉ. विजील राहुलन यांनी व्यक्त केले आहे. सर्वांनी देवानंदच्या उपचारासाठी प्रचंड मेहनत घेतली. आद्यापही देवानंदला प्राणवायूचा आधार आहे. त्याचा संघर्ष पूर्णपणे संपला असं म्हणता येणार नाही. देवानंदचा भाऊ किरण तेलगोटे यांनी व कुटुंबीयांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या देवानंदच्या मित्रपरिवाराचे आभार मानले आहेत.

loading image
go to top