esakal | मध्यरात्री स्‍मशानभूमित अघोरी पुजा; मांत्रिकांसह युवकावर कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

मध्यरात्री स्‍मशानभूमित अघोरी पुजा; मांत्रिकांसह युवकावर कारवाई

मध्यरात्री स्‍मशानभूमित अघोरी पुजा; मांत्रिकांसह युवकावर कारवाई

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मलकापूर : रात्रीच्‍या किर्रर्रर्र आवाजात.. स्मशानभूमिमध्ये मृत वडिलांच्या आणि भावाच्या आत्म्याला शांती लाभावी, या हेतूने येथील एका युवकाने छत्तीसगड येथील तीन मांत्रिकांना आणले. थेट स्मशानभूमित रात्रीच्या अंधारात दिवे लावून भला मोठा जाळ आणि त्या मांत्रिकांच्या भयावह आवाजात अघोरी पुजा सुरू केली. हा प्रकार स्मशानभूमिच्या बाजूला वस्तीतील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आणला.

येथील माता महाकाली परिसरात वैकुंठधाम स्मशान भूमिमध्ये छत्तीसगड येथील तीन मांत्रिक प्रेत जाळण्याच्या ठिकाणी दिवे लावत, आग करून अघोरी पुजा करत होते. सदर मांत्रिक हे जोरजोरात आवाज करीत असल्‍याने परिसरातील नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली. मात्र, हिंमतीने काही नागरिकांनी एकत्रित येत स्मशानभूमित जावून पाहिले असता सुरू असलेला प्रकार उघड झाला.

हेही वाचा: 'महाविकास'ला कुबड्या घेऊनच चालावे लागणार, आशिष शेलारांची टीका

त्यानंतर नागरिकांनी सुरू असलेली ही अघोरी पुजेसह त्या मांत्रिकांना हटकले. त्यांना आणणाऱ्या आशिष गोठी यालाही जाब विचारला असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. आपल्या मृत वडीलांच्या व भावाच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून ही पुजा करीत असल्याचे त्याने सांगितले. नागरिकांनी सुरू असलेला हा प्रकार उधळून लावीत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तीन मांत्रिकांसह आशिष गोठी याला ताब्यात घेतले. यांना पोलिस स्टेशनला नेवून त्यांच्यावर कलम १८८ अशी प्रतिबंधात्मक कारवाई केली.

एकीकडे अंधश्रध्दा निर्मूलना बाबत मोठी जनजागृती होत असताना अशा प्रकारांना थारा न देण्याबाबत नागरिकांमध्ये जनजगागृतही केली जात आहे. मात्र, या अघोरी व अंधश्रध्देला खतपाणी घालण्याचा प्रकार मलकापूर शहरात घडला असून याबाबत आता पोलिस प्रशासन कोणती ठोस अशी भूमिका घेते हे सुध्दा पाहणे तेवढेच गरजेचे आहे.

loading image