

अकोला : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ७) झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. याबाबत नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात ५ हजार २४२.९७ हेक्टर क्षेत्रावरील गहू, कांदा, टरबुज, पपई, भाजीपाला व निंबु या पिकांचे नुकसान झाले.
त्यासोबतच लोणाग्रा (ता. अकोला) येथे एका युवकाचा वीज पडून मृत्यू झाला. वादळी वारा व अवकाळीमुळे १६ जनावरे दगावली, तसेच ४६ घरांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त झाली आहे.
जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात निसर्गाची अवकृपा झाली. त्यामुळे रब्बी पिकांवर शेतकऱ्यांची मदार होती. मात्र मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी गारपिटीने पिकांना झोडपले व क्षणात होत्याचे नव्हते झाले.
६ ते १९ मार्च दरम्यान जिल्ह्यातील पातूर, बार्शीटाकळी व तेल्हारा तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. यामध्ये गहू, कांदा भाजीपाला, हरभरा, भुईमुंग, टरबुज व आंबा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर व त्याचा अहवाल शासनाकडे पाठवल्यानंतर शुक्रवारी (ता. ७) जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यासोबतच काही ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिसकावला. जिल्ह्यातील काही भागात ७ एप्रिल रोजी दुपारी अचानक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
त्यानंतर सायंकाळी सुद्धा जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह अवकाळीने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. दरम्यान जिल्हा प्रशासनाने अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला असून पाच हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे व सर्व्हेक्षणाची कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
असा बसला शेतकऱ्यांना फटका
क्षेत्राचे नुकसान ः बार्शीटाकळी तालुक्यात १९९ हेक्टर, पातूर तालुक्यात ३ हजार २५.९७ हेक्टर, अकोला तालुक्यात ७२५ हेक्टर, मूर्तिजापूर तालुक्यात ५२ हेक्टर व बाळापूर तालुक्यात एक हजार २४१ हेक्टर, असे एकूण पाच हजार २४२.९७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
ही पिके झाली प्रभावित ः गहू, कांदा, टरबुज, पपई, भाजीपाला व निंबु या पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर आंब्याच्या झाडाला लागलेल्या कैऱ्या जमिनदोज झाल्या आहेत. काही गावांमध्ये पपईची बागच अवकाळीने उद्धवस्त केली.
युवकाचा मृत्यू; जणावरे दगावली ः अकोला तालुक्यात लोणाग्रा येथे पुंडा पंढरी माने (वय ३५) या युवकाचा वीज पडून मृत्यू झाला. याव्यतिरिक्त अकोला तालुक्यातील १४ लहान जनावरे व बाळापूर तालुक्यातील २ मोठे जनावरे वीज पडून दगावली.
घरांचे नुकसान ः बार्शीटाकळी तालुक्यातील तीन घरे, पातूर येथील १२, अकोला येथील दोन, मूर्तिजापूर येथील २६ व बाळापूर येथील दोन घरांचे अंशतः तर मूर्तिजापूर तालुक्यातील एका घराचे पूर्णत: नुकसान झाले.
पंचनाम्यांची कार्यवाही सुरु ः जिल्ह्यातील इत्तर तालुक्यांच्या नुकसानीचा अहवाल निरंक असून अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे व सर्व्हेक्षणाची कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.