
लशींसाठी गर्दीचा उच्चांक, पोलिस बंदोबस्तात लसीकरण
वाशीम ः लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांचा थंड प्रतिसाद मिळत होता, मात्र आता दुसऱ्या टप्प्यात लसीकरण करण्यासाठी प्रचंड गर्दी उसळत आहे. वाशीम येथील शासकीय रुग्णालयात मंगळवारी (ता.११) दुसऱ्या डोजसाठी प्रचंड गर्दी झाल्याने पोलिस बंदोबस्तात लसीकरण करण्याची वेळ आली. शहरी भागात गर्दी अनियंत्रीत होत असताना ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रावर नियोजनबद्ध पद्धतीने लसीकरण केले जात आहे. लशींचा पुरवठा अपूरा होत असल्याने ही परिस्थीती निर्माण होत आहे. यावर जिल्हा प्रशासनाने तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग वाढत आहे. लाॅकडाउन लागल्यानंतर कोविड लसीसाठी नागरिक पुढाकार घेत आहेत, मात्र लशींचा पुरवठा कमी होत असल्याने जिल्हा प्रशासनाची तारांबळ होत आहे. शहरी भागात लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी होत आहे. नागरिक सकाळपासूनच लसीकरण केंद्रावर रांगा लावत आहेत. लशींची उपलब्धता व उपस्थित नागरिक यामध्ये मोठी तफावत असल्याने लस मिळाली नाही, तर नागरिक आक्रमक होत आहेत. परिणामी वाशीम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या लसीकरण केंद्रावर सकाळपासूनच अडिच हजार नागरिक रांगेत उभे होते. लशींची उपलब्धता केवळ ५०० असल्याने उर्वरित नागरिक आक्रमक झाले होते. परिणामी रुग्णालय प्रशासनाला पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली. पोलिसांनी परिस्थीती नियंत्रणात आणल्याने जमाव शांत होवून लसीकरण सुरळीत झाले. सध्या १८ ते ४४ वयोगटासाठी पहिला डोज, तर ४५ वरिल वयोगटासाठी दुसरा डोस, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळेही गोंधळ उडत असून, प्रशासनाने नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
---------------------------
ग्रामीण भागात योग्य नियोजन
शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रांना दररोज १०० डोज देण्यात येतात. प्राथमिक आरोग्य केंद्रावर सकाळी प्रथम येणाऱ्याला प्राधान्य देवून १०० आधारकार्ड जमा केले जातात. इतरांना दुसऱ्या दिवसी बोलविले जाते. त्यामुळे गर्दी नियंत्रणात राहते. वाशीम तालुक्यातील पार्डीटकमोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावरची ही व्यवस्था इतरत्र राबविली, तर गोंधळ कमी होण्यास मदत होणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने नियोजन करण्याची गरज आहे.
नोंदणी कक्ष स्थापन करण्याची गरज
सध्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीसाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे, मात्र ग्रामीण भागात पुरेशा नेटवर्क अभावी नोंदणी करण्यास अडचण येत आहे. त्यामुळे हे नागरिक सरळ कोविड लसीकरण केंद्रावर येतात. येथे आल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद घालतात. प्रशासनाने ऑनलाईन पर्याय खुला ठेवून ऑफलाईन नोंदणी कक्ष स्थापन करण्याची गरज आहे. नोंदणी झालेल्या नागरिकांचा संपर्क क्रमांक घेवून उपलब्ध लशींचा साठा व नागरिकांचे लसीकरण याचा समन्वय साधणे सोपे जाईल. यासाठी संबंधित नागरिकाला लसीबाबत तारीख व वेळेचा संदेश दिला, तर अनावश्यक गर्दीवर नियंत्रण साधणे सोपे जाईल.
Web Title: Crowds Peak For Vaccinations Vaccinations In Police
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..