मॉन्सूनचे आगमन तरीही या आराखड्यातील कामे अपूर्णच; हा हलगर्जीपणा भोवणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

उन्हाळ्यात जिल्ह्यातील सातही तालुक्यात राहणाऱ्या नागरिकांना प्रत्येक वर्षी पाणीटंचाईचे चटके जाणवतात.

अकोला : जिल्ह्यात मॉन्सूनचे आगमन झाले असून सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. परंतु त्यानंतर सुद्धा उन्हाळात ग्रामीणांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी तयार करण्यात आलेल्या टंचाई आराखड्यातील कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे अपूर्ण कामे जुलै महिन्यात पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना पावसाळ्यात पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याने यंत्रणेची कामाबद्दलची हलगर्जी दिसून येत आहे.

उन्हाळ्यात जिल्ह्यातील सातही तालुक्यात राहणाऱ्या नागरिकांना प्रत्येक वर्षी पाणीटंचाईचे चटके जाणवतात. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईच्या झळांपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा प्रशासनाला पाणीटंचाई कृती आराखडा सादर करण्यात येताे. या आराखड्यानुसार यावर्षी ३८१ गावांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाईची स्थिती उद्‍भवण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

त्यासाठी ५९० उपाययाेजना सुद्धा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने प्रस्तावित केल्या होत्या. संबंधित उपाययोजनांपैकी काही उपाययोजनांची कामे कोरोना काळात अडकली होती. परंतु त्यानंतर त्यांना गती देण्यात आली. असे असल्यानंतर सुद्धा नळ योजना विशेष दुरूस्ती व तात्परत्या पुरक नळ योजनेची कामे जून महिना संपायला आल्यानंतर सुद्धा अपूर्ण आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पाणी पावसाळ्यात मिळेल काय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

ही कामे आहेत अपूर्ण
जिल्ह्यात ८ गावांसाठी प्रस्तावित करण्यात आलेली नळ योजना विशेष दुरुस्तीची आठ व तात्पूरत्या नळ योजनेची ५ गावांसाठीची ५ कामे अपूर्ण आहेत. संंबंधित गावातील नागरिकांना कामे पूर्ण करुन ग्रामस्थांना आता पावसाळ्यात पिण्याचे पाणी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

शंभर उपाययोजना पूर्ण
पाणी टंचाई निवारणाच्या शंभर उपाययोजना पूर्ण झाल्या आहेत. थ्यात नवीन विंधन विहिरींच्या २८, कुपनलिकेच्या ४०, नळ योजना विशेष दुरस्तीच्या १०,तात्पुरत्या नळ योजनेच्या दोन, टॅंकरने पाणीपुरवठ्याच्या दोन, खाजगी विहिर अधिग्रहणाच्या १८ योजना पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे १२३ ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळाल्याचा दावा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Despite the arrival of monsoon, the work in this plan is still incomplete in akola