औषध असूनही मिळेना

भगवान वानखेडे 
Thursday, 13 August 2020

सर्दी, ताप, खोकल्याच्या औषध विक्रीचे शहरातील चित्र ः डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्रीवर निर्बंध

अकोला ः कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता आणि बाधित रुग्ण लगेच शोधता यावा यासाठी अन्न व औषध विभागाने सर्दी,ताप, खोकला या आजाराच्या रुग्णाला डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देऊ नये असे आदेशित केले होते. तर हे औषध देताना त्या रुग्णांचा संपर्क क्रमांक आणि पत्ता घ्यावा अशा सूचना होत्या. मात्र, या सर्व भानगडीत न पडण्यासाठी शहरातील किरकोळ औषध विक्रेत्यांनी सर्दी,ताप, खोकल्याचे औषधच ठेवणे बंद केले असल्याची स्थिती आहे. तेव्हा औषध आहे आणि रुग्णही मात्र, त्या औषधांची किरकोळ विक्री थांबली असल्याचे चित्र आहे.  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकोला शहर आणि जिल्ह्यात विविध विभागाच्या वतीने आवश्यक त्या खबरदाऱ्या घेतल्या आहेत. त्यातीलच एक सर्दी, ताप, खोकला या आजाराची लक्षणं असलेल्या रुग्णांला डाॅक्टरांच्या प्रिक्सीप्शनशिवाय औषध देऊ नये असे अन्न व औषध विभागाने आदेशीत केले होते. या आदेशासोबतच  ॲंटीबायोटीक औषध देण्यावरही निर्बंध घातले होते. असे जरी असले तरी या आदेशासोबतच औषध देताना त्या रुग्णांचा संपर्क क्रमांक आणि पत्ता घ्यावा अशा सूचना होत्या. मात्र, या सर्व भानगडीत न पडण्यासाठी शहरातील किरकोळ औषध विक्रेत्यांनी सर्दी,ताप, खोकल्याचे औषधच ठेवणे बंद केले असल्याची स्थिती आहे. याऊलट शहरातील ठोक विक्रेत्यांकडे या औषधाचा भरपूर प्रमाणात साठा असून, त्यांच्याकडून हव्या त्या प्रमाणांत या औषधांची उचल होत नसल्याची स्थिती आहे. 

सिव्हिल लाईन्स चौकात केली होती एक कारवाई
येथील सिव्हिल लाईन्स चौक परिसरातील अकोला मेडिकल स्टोअर्सच्या श्रॉफ नामक औषधी विक्रेता डॉक्टरांच्या प्रिक्सीप्शनशिवाय अझिथ्रोमायसिन ही १०६ रुपये किंमतीची ॲंटीबायोटीक औषधी विकत असल्याची माहिती अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त हेमंत मेटकर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे २६ नोव्हेंबर रोजी हेमंत मेटकर यांनी तीच ॲंटीबायोटीक औषधी मागितली असता त्यांना देण्यात आली. यानंतर चौकशी करून सदर औषधी विक्रेत्याला नोटीसही बजावण्यात आली होती. त्यानंतर  या औषध विक्रेत्याचा परवाना एक महिन्यांसाठी निलंबीत करण्यात आला होता.

प्रत्येकच मेडिकल रुग्णालयाजवळ नाही
साधे अंगदुखी आणि नाॅर्मल ताप, सर्दी असणारे रुग्णालयात न जाता मेडिकलमध्ये जाऊन औषध खरेदी करतात. बहुतांश मेडिकल हे रुग्णालयाजवळ नाहीत. तेव्हा अशा मेडिकल स्टोअर्स हे औषध ठेवणेच बंद केले असल्याची माहिती आहे.

सर्दी आणि ताप या औषधांची कमतरता नाही. केवळ डॉक्टरांच्या चिठ्ठीवरून औषधे विकली जात आहेत. तरीही औषध विक्रेत्यांनी ही औषधं मेडिकल स्टोअर्समध्ये ठेवावी.
-हेमंत मेटकर, सहाय्यक आयुक्त, औषध विभाग, अकोला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Despite the drug was not found