जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लळा, मुलांच्या घरीच आली शाळा, अकोला तालुक्‍यातील पाचमोरी येथील द्विशिक्षकी शाळेचा उपक्रम

मनोज भिवगडे
Tuesday, 28 July 2020

सध्या सर्वत्र ऑनलाइन शिक्षणाचे वारे वाहू लागले आहेत; पण ज्या पालकांजवळ मोबाईलचं नाही अशा मुलांचे काय? या प्रश्‍नाचे उत्तर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेने शोधून काढले. अशा विद्यार्थ्यांच्या थेट घरी जाऊन शिक्षण देण्याचा उपक्रम जिल्हा परिषद शाळा पाचमोरी येथील मुख्याध्यापिकेने सुरू केला आहे.

अकोला  ः सध्या सर्वत्र ऑनलाइन शिक्षणाचे वारे वाहू लागले आहेत; पण ज्या पालकांजवळ मोबाईलचं नाही अशा मुलांचे काय? या प्रश्‍नाचे उत्तर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेने शोधून काढले. अशा विद्यार्थ्यांच्या थेट घरी जाऊन शिक्षण देण्याचा उपक्रम जिल्हा परिषद शाळा पाचमोरी येथील मुख्याध्यापिकेने सुरू केला आहे.

अकोला पंचायत समितींतर्गत पाचमोरी येथील जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते पाचवीची द्विशिक्षकी शाळा. या शाळेत शंभर टक्के विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील. सद्यस्थितीत कोरोनाने शिक्षणाची संपूर्ण दिशाच बदलली आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे आवाहन होते. या आवाहनाला सामोरे जाण्यासाठी या शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा शेजोळे यांनी गावकऱ्यांच्या मदतीने सुरू केलेला उपक्रम दिशादर्शक ठरणारा आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

आजही जेमतेम तुटपुंज्या मजुरीवर जगणारे पालक मुलांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवण्याची इच्छा नसतानाही काहीही करू शकत नाही, हे निर्विवाद सत्य आहे. अशा परिस्थितीत मनिषा शेजोळे यांनी परिस्थितीपुढे न झुकता त्यावर उपाय शोधून काढलेत. त्यांनी वर्गातील ज्या मुलांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे त्यांचेसाठी ऑनलाइन तर ज्या मुलांकडे साधा मोबाईल आहे, त्याच्या पालकांच्या मोबाईलवर सूचनांचे मेसेजेस पाठवणे सुरू केले. पण...ज्यांचेजवळ मोबाईलचं नाही अशा मुलांचे काय? असा प्रश्न त्यांना सतावू लागला. शेवटी अशा मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून त्यांनी मुलांच्या घरी जाऊन त्यांना शिकविण्याचा उपक्रम सुरू केला. पालकांना व विद्यार्थ्यांना घरी जावून मार्गदर्शन सुरू केले. मास्क लावून विद्यार्थ्यांना अभ्यासाला बसवले.
 
स्वखर्चातून साहित्य वाटप
पालकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेवून विद्यार्थ्यांना स्वखर्चातून लेखन साहित्याचे वाटप केले. स्वतः स्वाध्याय पुस्तिकेच्या झेरॉक्‍स काढून मुलांना दिल्या. लर्न फ्रॉम होमच्या जिल्हास्तरीय अभ्यास गटात सदस्य व तालुका समिती सदस्य असलेल्या मनिषा शेजोळे यांनी स्वतः घटकानुसार अनेक शैक्षणिक व्हिडिओ, पीपीटी, स्मार्ट पीडीएफ, फ्लीपबुक्‍स यास्वरूपात ई-कंटेंट निर्मिती केली असून, जिल्ह्यातील शिक्षकांना तंत्रज्ञानाच्या वापरासंबंधी मार्गदर्शन केले.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Education struggle for Zilla Parishad school students, school came to childrens homes, initiative of two-teacher school at Pachmori in Akola taluka