जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना देणार इंग्रजीचे धडे, मात्र, सेमी इंग्लीश शाळेसाठी शिक्षकांची कमतरता

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 19 June 2020

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी शाळांमध्ये सेमी इंग्लीश माध्यम सुरू करण्याचा ठराव यापूर्वी शिक्षण समितीने घेतला होता. परंतु त्यासाठी इंग्रजी माध्यमाचे डी.एड. पात्रताधारक शिक्षक कमी असल्याने ज्या शिक्षकांना इंग्रजी शिकवण्याची आवड आहे. त्यांना इंग्रजीचे प्रशिक्षण देवून सेमी इंग्लीश माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात आला.

अकोला : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी शाळांमध्ये सेमी इंग्लीश माध्यम सुरू करण्याचा ठराव यापूर्वी शिक्षण समितीने घेतला होता. परंतु त्यासाठी इंग्रजी माध्यमाचे डी.एड. पात्रताधारक शिक्षक कमी असल्याने ज्या शिक्षकांना इंग्रजी शिकवण्याची आवड आहे. त्यांना इंग्रजीचे प्रशिक्षण देवून सेमी इंग्लीश माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुमार आहे. त्यामुळे शाळांची पटसंख्या घसरत चालली आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षणाचा दर्जा वाढवून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी शाळांमधून इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने घेतला होता. त्यासाठीची प्रक्रिया शाळा सुरु करण्यापूर्वी राबविण्यासंदर्भात गुरुवारी (ता. १८) शिक्षण समितीच्या सभेत चर्चा करण्यात आली. यावेळी सेमी इंग्लीश माध्यमातून शिक्षण सुरु करण्यासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणारे कमी शिक्षक उपलब्ध असल्याची माहिती सभेत समोर आली. त्यामुळे ज्या शिक्षकांना इंग्रजी शिकविण्याची आवड आहे, अशा शिक्षकांना प्रशिक्षण देवून सेमी इंग्रजीचा अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. सभेत बांधकाम व शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरूजी, सदस्य वर्षा वजीरे, गणेश बोबडे, पवन बुटे, आम्रपाली खंडारे, राम गव्हाणकर, प्रगती दांदळे, रंजना विल्हेकर, रिजवाना परवीन शेख व समितीच्या सचिव व प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांची उपस्थिती होती.

प्रत्येक शाळेत महिला शिक्षिकेची नियुक्ती
जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थीनींची संख्या अधिक आहे. त्यामुळे मुलींच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक शाळेत किमान एका महिला शिक्षिकेची नियुक्ती करण्याचा ठराव घेण्यात आला. त्यासाठी प्रत्येक शाळेतील मुलींची संख्या व कार्यरत शिक्षकांची संख्या यासंबंधीचे नियोजन करण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

सभेतील इतर महत्वपूर्व मुद्दे
० वडाळी येथे वर्ग सुरु करण्याबाबत ठराव घेण्यात आला.
० बार्शीटाकळी व अकोट येथील गटशिक्षणाधिकारी सभेत अनुपस्थित असल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले.
० विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षक न देता वर्गनिहाय शिक्षक देण्यात यावे तसा ठराव घेवून शासनाला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
० विद्यामंदिर शाळा नया अंदुरा करिता जिल्हा परिषदेस मिळत असलेल्या उत्पन्नातून भौतिक सुविधा व इमारती बांधण्यासाठी बजेटमध्ये तरतूद करण्याचा ठराव घेण्यात आला.
० अंबारी, अंबापाटी, तटाई, मोटा पाणी येथे शाळा सुरू करण्याचा ठराव घेण्यात आला.
० आदर्श शिक्षक प्रमोद फाळके यांची शिक्षण समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: English lessons will be given to Zilla Parishad teachers, however, there is a shortage of teachers for semi-English schools akola marathi news