esakal | रस्त्यावर व्यायाम करणे ठरत आहे धोकादायक
sakal

बोलून बातमी शोधा

Exercising on the streets in Shirpur is becoming dangerous.jpg

शिरपूर येथे एखादे क्रिडा मैदान उपलब्ध व्हावे, अशी मागणी युवा वर्गाकडून केल्या जात आहे.

रस्त्यावर व्यायाम करणे ठरत आहे धोकादायक

sakal_logo
By
संतोष गिरडे

शिरपूर जैन (अकोला) : पोलिस भरती, सैन्यभरती यासाठी युवावर्ग मोठ्या जोमाने प्रयत्न करीत आहे. मात्र येथे क्रिडा मैदान उपलब्ध नसल्याने हे युवक मालेगाव-रिसोड या महामार्गावर व्यायाम करतात. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असल्याने युवकांना तथा नागरिकांना व्यायाम करणे धोकादायक ठरत आहे. शिरपूर येथे एखादे क्रिडा मैदान उपलब्ध व्हावे, अशी मागणी युवा वर्गाकडून केल्या जात आहे.

शरीर सुदृढ राहावे, तसेच विविध आजारांपासून सुटका व्हावी, यासाठी वयोवृद्ध मंडळी, महिला तथा बालके हे सकाळी रस्त्यावर फिरायला जातात. तर युवा वर्ग भविष्य घडविण्याचे लक्ष डोळ्यासमोर ठेवून पोलिस भरती, सैन्यभरती करिता तयारी करण्याच्या हेतूने दररोज या नव्याने बनलेल्या मालेगाव-रिसोड महामार्गावर व्यायाम करतात. रस्त्याच्याकडेला व्यायाम करताना रस्त्याने वाहनांची ये-जा सुरू असते.

दरम्यान सकाळी अंधार असतो. त्यात एखाद्या वाहनांचा ताबा सुटल्यास दुर्दैवाने अपघातही घडू शकतो. तर युवा वर्ग पळतांना त्यांना रस्त्याने पळावे लागते. कधी वाहनांचा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे त्यांची एकाग्रता भंग पावते, तर वयोवृद्ध, महिला तथा लहान मुलेदेखील रस्त्याने फिरतांना व्यायाम करताना दिसतात. त्यांनाही हा रस्ता धोक्याचा ठरू शकतो.

तेव्हा शिरपूर परिसरात मोठ्या प्रमाणात (गायरान) ई-क्लास च्या जमिनी आहेत. त्या संपूर्णतः अतिक्रमित आहेत. तेव्हा अशा ई-क्लास जमिनी मोकळ्या करून, मोठ्या स्वरूपात क्रिडा मैदान निर्माण होऊ शकते. जेणेकरून येथील युवा वर्गासह सर्वांनाच फिरायला व व्यायाम करायला ही हक्काची व सुरक्षित जागा उपलब्ध होऊ शकेल. रस्त्यावर व्यायाम करणे मोठे धोक्याचे होत आहे. तेव्हा शासनाद्वारे मैदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी युवा वर्गाकडून केल्या जात आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले