esakal | अन् गल्लीतच पेटलंय सोशलयुध्द
sakal

बोलून बातमी शोधा

अन् गल्लीतच पेटलंय सोशलयुध्द

अन् गल्लीतच पेटलंय सोशलयुध्द

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : निसर्गाचा प्रकोप, दुष्काळाचे सावट आणि मदतीची आस अशी त्रि-सूत्रात गुंतलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही नेमकं यातून बाहेर पडण्यासाठी काय करावे आणि काय नाही याबाबत गोंधळ आहे. पीककर्ज काढल्यानंतर त्यांचा विमा काढण्याची लगबग शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाने लावली. दुर्दैवाने गेल्या वर्षीप्रमाणे यंदा निसर्ग कोपला. गेल्या वर्षीची मदतच असून पदरात नाही तर यंदाचा विचार ते दूरच आहे. अशातच जिल्ह्यातील सध्याच्या ज्वलंत पीकविम्याच्या मुद्यावर मात्र, सोशल मिडीयावर सेना- भाजप समोरासमोर आले असून, सोशल मिडीयावर स्टेट्सच्या माध्यमातून येत्या ५ ऑक्टोबरला बैठकीसंदर्भात पोस्ट टाकत एकप्रकारे शीतयुद्ध सुरू झाले आहे.

जिल्ह्यातील पीकविम्यासंदर्भात भाजप आमदार डॉ. संजय कुटे यांनी गेल्या काही महिन्याअगोदर प्रश्‍न शासनदरबारी लावून धरला. सातत्याने फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधत पीकविम्याबाबत संबंधित कंपनी आणि शासनाची भूमिका स्पष्ट केली. यासंदर्भात कृषी मंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच आमदारांच्या उपस्थितीत बैठक घेऊन पीकविमा लाभ शेतकऱ्यांना मिळण्यासाठी चर्चा करण्यात येऊन संबंधित कंपनीला लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले. परंतु, यासंदर्भात आ. कुटे यांनी अल्टीमेटम देत १५ दिवसांचा अवधी दिला होता. यानंतरही कंपनीकडून कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसह मंत्रालयात ठिय्या दिला.

यावर तत्काळ संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून लाभ देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. तर, खासदार प्रतापराव जाधव यांनी कृषी मंत्र्यांची भेट घेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यासाठी मागणी केली होती. यानंतर कृषी मंत्र्यांनी जिल्ह्यातील पीकविमा संदर्भात दुसऱ्यांदा आता ५ ऑक्टोबरला मंत्र्यांलयात बैठक बोलावली आहे. एखादी समस्या ही जिल्ह्याशी निगडित असली तर त्यासाठी पालकमंत्री, खासदार व सर्वच मतदार संघातील आमदार अपेक्षित असतात. परंतु, जिल्ह्यात बैठक लावण्यावरुनच राजकारण सुरू झाले असून, श्रेयवादासाठी चढाओढ सध्या सोशल मिडीयावरुन वेगवेगळ्या पोस्ट आणि बॅनरवरुन दिसून येत आहे. बैठकीच्या आयोजनावरून पोस्टरबाजी केल्यापेक्षा बैठकीत पीकविमा मिळण्यासाठी कोण आक्रमकता दाखवीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरच कोण कैवारी होते याकडे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पाठपुरावा अन् श्रेयाचा खटाटोप

माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांनी गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांची मुख्य समस्या असलेल्या पीकविमा लाभासंदर्भात पाठपुरावा करत आले आहे. यासंदर्भात पहिल्या बैठकीत त्यांनी कृषी मंत्र्यांसमोर आक्रमक पवित्रा घेत मंत्रालयात आंदोलन करण्यात आले होते. आता सदर प्रश्‍न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवीत झाल्या असताना खा. जाधव यांनी यात उडी घेत श्रेयासाठी खटाटोप सुरु केल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.

loading image
go to top