
मूर्तिजापूर (अकोला) : अस्मानी आणि सुलतानी संकटात शेतकरी नेहमीच आळीपाळीने पिचून निघत असतो, परंतु 'कोरोना महामारी'च्या स्वरुपातील या दोन्ही संकटांचा सामना करणारा शेतकरी बांधव भाजीपाल्याचे भाव प्रचंड कोसळल्याने पुरता कोसळला आहे.
हवामान बदल, अवकाळी पाऊस, बोंडअळी, गारपीट यांसारखी अस्मानी संकटे सातत्याने हल्ले करीत असतात. एमएसपी न मिळणे, कर्जमुक्ती न मिळणे, सावकारी पाश आवाळल्या जाणे अशा सुलतानी संकटांचाही पिच्छा कायम असतो. अशातच गेल्या वर्षापासून लॉकडाऊन या नव्या अस्मानी आणि सुलतानी अशा संयुक्त संकटाची भर पडल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. या संकटात भाजीपाला उत्पादक शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे.
भाजीपाल्याच्या दरात सतत घसरण सुरुच आहे. जवळपास सर्वच भाज्यांचे दर कमालीचे खाली उतरले आहेत. भाजीपाला उत्पादकांना त्याचा प्रचंड फटका बसत असल्याने तालुक्यातील शेतकरी वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे. २०२० पासून राज्यासह जिल्हाभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाला आळा घालता यावा या उदात्त हेतूने शासन निर्णयानुसार जिल्हा प्रशासनाने सक्तीचे लॉकडाऊन लागू केले होते. या सुरुवातीच्या कालावधीपासून तर आतापर्यंत म्हणजेच फेब्रुवारी २०२१ पासून नव्याने सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आठवडी बाजार बंद असल्याने तालुक्यातील भाजीपाल्याच्या दरात लक्षणीय घट झाल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
सद्यस्थितीत लिलावातील भेंडीचे भाव वगळता ठोक बाजार भाव पाहिल्यास टमाटर प्रती किलो दर ५ रु, वांगे प्रती किलो २ रु, मिरची प्रती किलो ८ रु, पालेभाज्या प्रती कि १० रु यांसह इतरही बाजार भावात लक्षणीय घट झाली आहे. मजुरी, वाहतूक यांसह लागत खर्चही निघत नसल्याने शेतकरी प्रचंड धास्तावला आहे. कोरोनामुळे आणि शासनाच्या उदासिन धोरणामुळे ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेरोजगार शेती व्यवसायाकडे वळत असले, तरी त्यांचा भ्रमनिरास होत आहे.
त्यामुळे दुसरीकडे त्यांच्या शेती व्यवसायातील वाढत्या सहभागाला खीळ लागत आहे व परिणामतः त्यांचा कल शेतीव्यवसायाकडे कमी होतांना दिसत आहे. वर्ष उलटून गेले तरी कोरोना संकटाची तालुक्यातील धग दिवसागणिक अधिक ज्वलंत होत आहे. या अनुषंगाने अनियमीत असलेले आठवडी बाजार सुरक्षित नियमांचे पालन करत नियमित करण्याची मागणी तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी वर्गाकडून होत आहे.
मी दोन एकर शेतजमिनीवर कोबीची लागवड केली आहे. मी स्वतः उत्पादक व विक्रेता सुद्धा आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे कोबीचे दर प्रती किलो २ ते ३ रु झाले आहेत. अन्य सर्वच भाजीपाल्यांच्या दरात मोठी घट झाली आहे, बाजार बंद असल्यामुळे कोसळलेले हे संकट बाजार सुरू झाले, तर सुधारू शकते
- विनोद उंबरकार, शेतकरी वा भाजी विक्रेता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.