esakal | शेतकऱ्यांनो सावधान, जरा जपून टाका पावलं
sakal

बोलून बातमी शोधा

3snake_bite_header.jpg

तीन महिन्यांत 27 जणांना सर्पदंश,एकाचा मृत्यू

शेतकऱ्यांनो सावधान, जरा जपून टाका पावलं

sakal_logo
By
भगवान वानखेडे

अकोला : पावसाळ्यात शेतीकामाना वेग येतो सोबतच बरसणाऱ्या पावसामुळे पिके जोमाने बहरतात. पण अश्यावेळी सरपटणारे साप ही याच शेतात वावरत असतात. तेव्हा शेतकऱ्यांनो अश्यावेळी सावध राहून शेत कामे करणे गरजेचे झाले आहे. कारण, जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत 27 जणांना सर्पदंश झाला असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. 

शेतकऱ्यांना शेतात कामे करण्यासाठी सोबतच रखवाली करण्यासाठी अनेकदा रात्रीच शेतात जावे लागते. रात्रीच्या अंधारात सरपटणाऱ्या प्राण्यांचा उपद्रव अधिक असतो. अंधारात चुकून एखाद्या सापावर पाय पडला की, संबंधित शेतकऱ्याला किंवा शेतमजुराला सर्पदंशाला सामोरे जावे लागते. विषारी सापाने चावा घेतल्यास प्रसंगी शेतकऱ्यांवर मृत्यूही ओढवतो. अशा अनेक घटना जून ते आॅक्टोबर या कालावधीत घडत आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर जून ते सप्टेंबर या महिन्यात सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना घडतात. पावसामुळे सापांच्या बिळामध्ये पाणी गेल्याने साप बिळाबाहेर येऊन सुरक्षित जागा शोधतात. शेतशिवार ही त्यांच्यासाठी अतिशय सुरक्षित जागा असते. त्यामुळे सापांची संख्या शेतशिवारात अधिक दिसून येते.  जिल्ह्यात बहुतांश लोकांचा शेती हाच व्यवसाय असल्याने शेतकऱ्यांना दररोज आपल्या शेतात जावेच लागते. शेतात जाताना योग्य खबरदारी घेतली नाही, तर सापांपासून स्वत:चे संरक्षण करणे कठीण जाते. यातूनच यावर्षी सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. सर्वाधिक सर्पदंशाच्या घटना जुलै महिन्यात घडल्याच्या नोंदी सर्वोपचार रूग्णालयात आहेत.  जून ते  आॅगस्ट महिन्यांत सर्वाधिक म्हणजे २७ जणांना सर्पदंश झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. 

आवश्यक लस उपलब्ध
सर्पदंशाच्या वाढत्या घटना लक्षात घेता आरोग्य विभागाने खबरदारी घेतली असून, त्यावर आवश्यक असलेली लस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिली आहे.  तरीही सर्पदंश होताच तत्काळ रुग्णालय गाठावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

असे घडल्या घटना
महिना        सर्पदंश       मृत्यु              बरे झालेले
जुन               06               01                    05
जुलै                13              00                    13
आॅगस्ट        08            00                      08
एकुण                27             01                    26
 

loading image
go to top