करडी परिसरातील शेतकरी सेंद्रिय शेतीकडे ; तीस गुंठ्यामध्ये 10 विविध वाणाचा प्रयोग

डॉ. विजय जट्टे
Sunday, 20 December 2020

करडी येथील प्रगतशील शेतकरी देविदास पाटील जाधव यांनी करडी शिवारामध्ये 15 एकर शेती आहे. फळबागासह ते पारंपरिक पीक घेतात. शेतीमध्ये सोयाबीन, मका, तूरीसह मिरची, टमाटर यांचे ते विक्रमी उत्पन्न घेतात. मात्र, शेतीमधून येणारे हे उत्पन्न निसर्गावरच अवलंबून आहे.

धाड(बुलडाणा) : शेतीमालाला हमी भाव न मिळणे आणि मोठ्या प्रमाणात भाजीपालाची आवक वाढल्यास त्याचा खर्चही निघेना. या बिकट परिस्थितीत करडी येथील शेतकर्‍याने सकाळ अ‍ॅग्रोवनच्या माध्यमातून सेंद्रिय शेती करत आपल्या तीस गुंठ्यामध्ये तब्बल 10 विविध वाणाचा भाजीपाल्याची लागवड केली. या माध्यमातून प्रगतीचा मार्ग शेतकर्‍याने निवडला असून, इतर शेतकर्‍यांनी त्यांचा हा प्रयोग प्रेरणादायीच ठरणार असून, सेंद्रिय भाजीपाल्याला चांगली मागणी मिळत आहे.

करडी येथील प्रगतशील शेतकरी देविदास पाटील जाधव यांनी करडी शिवारामध्ये 15 एकर शेती आहे. फळबागासह ते पारंपरिक पीक घेतात. शेतीमध्ये सोयाबीन, मका, तूरीसह मिरची, टमाटर यांचे ते विक्रमी उत्पन्न घेतात. मात्र, शेतीमधून येणारे हे उत्पन्न निसर्गावरच अवलंबून आहे. पीक हातामध्ये आल्यानंतर त्यास हमी भाव मिळत नाही. पर्यायाने शेतीचा खर्च, मेहनत करून सुद्धा शेतीमधून आर्थिक उत्पन्न हातात मिळत नाही. तर, भाजीपाला लागवड केल्यास व आवक वाढल्यास भाजीपाला मातीमोल भावामध्ये विकावा लागतो. पर्यायाने शेतीमधून नवीन तंत्रज्ञान वापरून शेती करण्याचा त्यांना निश्‍चय केला. सकाळ अ‍ॅग्रोवनच्या माध्यमातून त्यांना एक आशेचा व प्रगतीची दिशा मिळाली. देविदास पाटील जाधव यांनी आपल्या सावली रस्त्यावर असणार्‍या तीस गुंठे क्षेत्रामध्ये सेंद्रिय भाजीपाला लागवड केली. 

यामध्ये गाजर, बीट, मुळा, कांदा, लसूण, शेंगडी, कोंथिबीर, शेपू, मेथी, पालक अशा दहा वाणाची वाफे पद्धतीनुसार लागवड केली. यासाठी मिनी स्प्रिंकलरचा वापर करण्यात आला. एकरी 10 हजार रुपये शेती मशागत, बियाणे यांचा खर्च येतो. हा भाजीपाला संपूर्ण सेंद्रिय असल्यामुळे फवारणीचा खर्च येत नाही. वाफे पध्दतीमुळे वेगवेगळ्या वाणांची लागवड होते. लागवडीपूर्वी शेतीमध्ये शेणखत आवश्यक आहे. शेण खतामुळे सर्वच भाजीपाला हा टवटवीत दिसतो तर ढगाळ वातावरणाचा परिणाम होत नाही. मिनी स्प्रिंकलर असल्यामुळे कमी पाणी व योग्य पद्धतीने पाणी मिळते. 

हे ही वाचा : मातृतीर्थच्या सुपुत्राला अखेरचा निरोप ; शहीद जवान प्रदीप मांदळे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार 

सेंद्रिय पध्दतीमुळे तणाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे या ठिकाणी मोठा खर्च वाचतो. रस्त्यावर शेती असल्यामुळे जागेवर मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्री होतो. विविध वाण शेतामध्ये असल्यामुळै एकाच ठिकाणी ग्राहकाला सर्वच माल मिळत असल्यामुळे व सेंद्रिय भाजीपाला असल्यामुळे ग्राहकांची मागणी वाढतच आहे. त्यामुळे शेती ही एक प्रकारची भाजीपाल्याचे दुकानच झाले असून, त्यामुळे मोठा लाभ होत आहे. विशेष म्हणजे हे सर्व पीक 45 दिवसांचे असल्यामुळे ताबडतोब पैसे हातामध्ये येतच राहत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ अ‍ॅग्रोवनच्या माध्यमातून शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकर्‍यांसाठी प्रगतीचा मार्ग आहे. सकाळ अ‍ॅग्रोवनच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन मी सेंद्रिय शेती करून नवीन तंत्रज्ञानानुसार भाजीपाला लागवड केली आहे. माझा हा प्रयोग समाधानकारक ठरला आहे.
- देविदास पाटील जाधव, शेतकरी, धाड.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in the Kardi area have turned to organic farming