अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी सप्टेंबर उगवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers of Akola district suffered damage due to heavy rains will get help in September

अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी सप्टेंबर उगवणार

अकोला - जिल्ह्यातील ८८ हजारांवर शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. जून-जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर प्रशासनाच्यावतीने शासनाकडे मदतीचा अहवालही पाठविला आहे. मात्र, ऑगस्टमध्ये पुन्हा अतिवृष्टी झाली. त्यामुळे ऑगस्टचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय शासनाकडून शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळण्याची शक्यता नाही. परिणामी सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पूरग्रस्त शेतकऱ्यांना दुप्पट मदत देण्याचा निर्णय शासनाने गत आठवड्यातच घेतला. त्यानुसार जून-जुलैमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदतीची अपेक्षीत रक्कम जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. असे असले तरी सध्या ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानाचे संयुक्त पंचनामे सुरू आहे. नुकसान झालेल्या क्षेत्रांची माेजणी सुरूच असल्याचे सरकारकडूनही सांगण्यात आल्याने या महिन्यात तरी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा हाेण्याची शक्यता कमीच आहे.

अकोला जिल्ह्यात जून व जुलै महिन्यात पुरामुळे शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ऑगस्टमध्ये तुफान पाऊस पडत आहे. त्यामुळे शेती खरडून गेली आहे. परिणामी आता पुन्हा पेरणी व शेतीच्या अन्य कामांसाठी पैसा कोठून आणावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

दुप्पट मदतीचा आनंद, पण...!

राज्य शासनाने अतिवृष्टीची मदत दुपटीने वाढवून प्रती हेक्टर १३ हजार ४०० रुपये केली आहे. सोबतच तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे दुप्पट मदत मिळण्याचा आनंद शेतकऱ्यांना असला तरी सध्या अडचणीच्या काळातच शासनाकडून मदत होणार नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोषही दिसून येत आहे. जून-जुलैमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपुढे दुबार-तिबार पेरणीचे संकट उभे आहे. त्यामुळे पुन्हा शेती पिकविण्याएवढे आर्थिक बळ नसल्याने शेतकरी शासनाच्या मदतीची अपेक्षा लावून बसला होता.

दोन महिन्यातच ८८ हजार शेतकरी बाधित

अकोला जिल्ह्यातील जून व जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ८८ हजार ८६८ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. सलग पाऊस पडत असल्याने ७७ हजार ७४७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. काेरडवाहू क्षेत्रावरील ७५ हजार ८३८ हेक्टर, बागायती क्षेत्रातील १०१ हेक्टर आणि ८२.७५ हेक्टर क्षेत्रातील फळ बागांची हानी झाली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एक हजार ७२४ हेक्टर जमीन खरडून गेली आहे.