शेतकऱ्यांनी विकले ६.६२ कोटींचे घरगुती बियाणे

शेतकऱ्यांचा पैसा शेतकऱ्यांच्याच खिशात; बियाणे महोत्सव ठरतोय पर्वणी
Seed
Seed sakal

अकोला - खात्रीच्या व दर्जेदार बियाणे उपलब्धतेसोबतच शेतकऱ्यांचा पैसा शेतकऱ्यांच्याच खिशात जावा, या उद्देशाने १ जूनपासून जिल्हाभरात आयोजित सहा दिवसीय बियाणे महोत्सवात दीड दिवसातच सहा कोटी ६२ लाख रुपयांच्या शेतकऱ्याच्या घरगुती बियाण्याची विक्री व बुकिंग झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांचा हा पैसा शेतकऱ्यांकडेच गेला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा महोत्सव शेतकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी ठरत आहे.

लोकसंख्या वाढीसोबतच दिवसेंदिवस अन्नधान्याच्यी मागणी सुद्धा वाढत आहे आणि ही मागणी पूर्ण करताना शेतकऱ्याला सर्वस्व पणाला लावावे लागते. परंतु, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अपेक्षित भाव बाजारपेठेत मिळत नसल्याने व उत्पादन खर्च प्रचंड वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणीत बिगडत असून, त्याचाच परिणाम म्हणचे शेतकऱ्यांच्या आत्महत्येची फुगलेली संख्या. त्यातही मुख्य भाग म्हणजे, विविध कंपन्यांद्वारे अव्वाच्या सव्वा किमतीत विकले जाणारे बियाणे आणि या बियाण्याच्या उगवणक्षमतेवर निर्माण झालेला प्रश्‍न शेतकऱ्यांची मोठी डोकेदुखी झाली आहे. त्यावर उपाय म्हणून, अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चु कडू यांनी शेतकऱ्यांनी तयार केलेल्या घरगुती बियाण्यांचा महोत्सव आयोजित करण्याची संकल्पना तयार केली.

या संकल्पनेनुसार कृषी विभागाने १ ते ६ जून दरम्यान जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बियाणे महोत्सवाचे आयोजन केले. विशेष म्हणजे या आयोजनाला शेतकऱ्यांनी सुद्धा प्रतिसाद देत, शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बियाण्याला पसंती दर्शवित गुरुवार दुपारपर्यंत ४९१० क्विंटल बियाण्याची बुकिंग व १९३५ क्विंटल बियाण्याची प्रत्यक्ष खरेदी, अशी एकूण सहा कोटी ६२ लाख ६१ हजार रुपयांची उलाढाल केली.

या उलाढालीतून शेतकऱ्यांना खासगी कंपन्यांच्या तुलनेत कमी किमतीत गुणवत्तापूर्ण, विश्‍वासपात्र व अधिक उगवणक्षमता असलेले बियाणे मिळाले तर, बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्‍या उत्पादनाला बियाण्याचे दर मिळाल्याने चांगले उत्पन्न झाले. या महोत्सवाला लाभत असलेला प्रतिसाद लक्षात घेता ६ जूनपर्यंत बियाणे विक्रीतून मोठ्याप्रमाणात आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता आहे.

लग्नाच्या तिथीचा परिणाम

शेतकऱ्यांकरिता आयोजित या बियाणे महोत्सवात दिड दिवसात जवळपास एक हजार शेतकऱ्यांनी त्यांची उपस्थिती दर्शविली. यापेक्षाही अधिक पटीने ही सख्या असती परंतु, लग्नाची तिथी दाट असल्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उपस्थितीवर झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, पुढील दिवसात उर्वरित शेतकरी निश्‍चितच या महोत्सवात उपस्थिती दर्शवितील, अशी खात्री कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दीड दिवसात झालेली बियाणे विक्री व बुकिंग

तालुका बुकिंग (क्विं.) विक्री (क्विं.) रक्कम (लाख)

अकोला ८२५ १९५ ७७.६

बार्शीटाकळी १२८० ६१५ १८८.५

मूर्तिजापूर ४५३ १९२ ६४.५

पातूर ८६० ३४८ १२०.३

बाळापूर ३९५ ९० ४८.५

तेल्हारा ६२० ३४२ ९६.२

अकोट ४७७ १५८ ६७.०१

एकूण ४९१० १९३५ ६६२.६१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com