esakal | लसीकरण केंद्रातूनच संसर्गाची भिती!

बोलून बातमी शोधा

लसीकरण केंद्रातूनच संसर्गाची भिती!

लसीकरण केंद्रातूनच संसर्गाची भिती!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला ः कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी महानगरातील बहुतांश केंद्रांवर शुक्रवारी (ता. ३०) वृद्धांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. गुरुवारी लस संपल्यामुळे लसीकरण बंद होते. परंतु दुसऱ्या दिवशी अचानक वृद्धांची गर्दी उसळल्यामुळे कोरोना लसीकरण केंद्रातूनच कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता वाढली आहे.

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे देशामध्ये सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परंतु लसींचा पुरवठा करण्यात केंद्र सरकार नेहमीच हात आखडता घेत असल्यामुळे अनेकदा लसीकरण मोहीम प्रभावित होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान गुरुवारी (ता. २९ एप्रिल) शहरातील सर्वच शासकीय लसीकरण केंद्रात लसींचा साठा उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण बंद करण्यात आले होते. त्यामुळे लाभार्थ्यांना निराश होत परत जावे लागले. परंतु शुक्रवारी (ता. ३०) लसींचा साठा उपलब्ध झाल्यानंतर कोरोना लसीकरणाची गती वाढली. शुक्रवारी शहरातील बहुतांश लसीकरण केंद्रावर लाभार्थ्यांनी सकाळपासूनच लस घेण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे लसीकरण केंद्रातूनच आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

जीएमसीत लांबच-लांब रांगा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) लसीकरण केंद्रावर शुक्रवारी (ता. ३०) सकाळ पासूनच मोठ्या संख्येने लाभार्थी पोहोचल्याचे दिसून आले. सदर लाभार्थ्यांमध्ये वयोवृद्ध म्हणजेच ६० वर्षांवरील लाभार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. त्यांना सकाळ पासूनच रांगेत उभे रहावे लागले, परंतु लसीकरणासाठी त्यांचा नंबर दुपारी लागला. दुपारी दोन वाजता नंतरसुद्धा बहुतांश नागरिक लसीकरणासाठी जीएमसीतील लसीकरण केंद्रावर पोहोचत असल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची गर्दी सुद्धा झाली होती.

कस्तुरबा गांधीमध्ये एकाच ठिकाणी गर्दी

जुने शहरातील डाबकी रोड वरिल कस्तुरबा गांधी रुग्णालयात शुक्रवारी (ता. ३०) सकाळ पासून लाभार्थ्यांची गर्दी दिसून आली. शेकडो वृद्धा लाभार्थी एकमेकांना लागून उभे असल्याचे दिसून आले. त्यामुळे याठिकाणी सुरक्षित अंतराच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. केंद्रात रांगेतील वृद्धांना बसण्यासाठी व्यवस्था नसल्याने ते रांगेत उभे राहून दमल्याचे निदर्शनास आले.

संपादन - विवेक मेतकर