कोरोना संकटात ओढवली आर्थिक आणीबाणी; मंजुरांचेही हाल

मुद्रकांवर उपासमारीची पाळी
कोरोना संकटात ओढवली आर्थिक आणीबाणी; मंजुरांचेही हाल

अकोला ः जिल्ह्यात लॉकडाउन सुरू झाल्यानंतर इतर अनेक उद्योगांप्रमाणेच प्रिंटिंग प्रेस उद्योगाला मोठा फटका बसला आहे. छपाई पूर्ण बंद असल्याने या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या शाई, प्रिंटिंग केमिकलसह कागद व्यावसायिकांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. जिल्हाधिकारी यांना नियम शिथिल करावे वर प्रेस सुरू ठेवण्याचे दृष्टीने निवेदनही दिले; Financial emergency in the Corona crisis परंतू लॉकडाउनचे नियम शिथिल केल्यानंतरही हा व्यवसाय सुरू होण्याची शक्यता नसल्याने व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.

दर वर्षी मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत शाळा-कॉलेजांसाठी लागणारे साहित्य, पुस्तकांच्या छपाईची लगबग सुरू असते. लग्नसराईमुळे लग्नपत्रिका, टूर कंपन्यांच्या पत्रकांच्या छपाईची गडबड असते. मात्र, यंदा लॉकडाउनमुळे व्यवसायाचा हंगाम गेला आहे. 'प्रिंटिंग प्रेस' बंद असल्याने शाई व्यावसायिक, प्रिंटिंग साहित्याचे विक्रेते, लग्नपत्रिका दुकानदार यांनाही मोठे नुकसान सोसावे लागत आहे. बाहेरगावातून मुद्रणाची कामे करून घेण्यासाठी इतर शहरांतील मुद्रक नियमितपणे अकोला शहरात येतात. लॉकडाउनमुळे या इतर मुद्रकांना शहरात येणे अशक्य झाले आहे.

अकोला जिल्ह्यातील काही मुद्रण व्यावसायिकांनी दुकाने, जागा भाडेतत्त्वावर घेतली आहे. या जागांचे भाडे, कामगारांचा पगार, वीजबिले या खर्चाचा भार कसा पेलायचा, याची चिंता व्यावसायिकांना भेडसावत आहे. काही मुद्रकांनी प्रिंटिंग मशिनरीसाठी लाखोंची तर काहींनी कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. त्याचे हप्ते भरण्याचाही मुद्रकांसमोर मोठा प्रश्न उभा आहे. या व्यवसायात मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक करावी लागते. त्यासाठी अनेक मुद्रक बँकेचे कर्ज घेतात. लॉकडाउनमुळे आर्थिक चणचण भेडसावते आहे. जागेचे भाडे, कामगारांचे पगार आणि बँकेचे हप्ते भरताना सामान्य मुद्रक जिकिरीला आला आहे. अकोला जिल्हा मुद्रक संघाचे अध्यक्ष प्रदीप गुरुखुद्दे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोल्या जिल्ह्यात सुमारे १५० प्रिंटिंग प्रेस आहेत. २५ डिजिटल प्रिंटिंग प्रेस आणि स्क्रीन प्रिंटिंग युनिट आहेत; तर सुमारे १५ कागद दुकानदार, पाच प्रिंटिंग प्लेट, १० केमिकल सप्लायर आहेत. सुमारे २१०० कामगार प्रिंटिंग प्रेसमध्ये कामाला आहेत; ५०० परिवाराचा उपजीविकेचे साधन आहे, तर या संबंधित व्यवसायाशी जिल्ह्यातील एकंदरित पाच हजार जण निगडित आहेत. या व्यतिरिक्त नोंदणी नसणाऱ्या मुद्रकांच्या प्रेसची संख्याही २०० च्या घरात आहे.

मुद्रक संकटात,प्रशासनाला हाक

अत्यावश्यक सेवेसाठी लागणाऱ्या साहित्याची छपाई प्रशासनाने सांगितल्यानुसार रात्रंदिवस काम करून काही मुद्रकांनी पूर्ण करून दिली. परंतु, गेल्या दोन महिन्यांत मुद्रण व्यवसायाची दखल सरकार अथवा स्थानिक प्रशासनाने घेतलेली नाही. लॉकडाउनचे नियम शिथिल झाल्यावरही मुद्रण व्यवसाय सुरू करण्याबद्दल स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे अकोला जिल्हा मुद्रक संघाचे अध्यक्ष व सचिव तसेच काही पदाधिकाऱ्यांनी निवासी जिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांची भेट घेऊन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्याची विनंती केली. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कोणतेही उत्तर मिळाले नसल्याची माहिती मुद्रक संघाचे अध्यक्ष प्रदीप गुरुखुद्दे यांनी दिली.

लॉकडाउनच्या काळात सामान्य मुद्रकाची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. प्रशासनाने कोणत्याही सुविधा मुद्रकांसाठी जाहीर केलेल्या नाहीत. लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केल्यावर प्रिंटिंग प्रेस सुरू करण्याबाबत प्रशासनाने स्पष्टता दिलेली नाही. परिणामी मुद्रण व्यवसाय संकटात सापडला आहे.

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com