esakal | शिवलीला पाटीलच्या किर्तनाचे आयोजन आले अंगलट, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

कीर्तनकार शिवलीला पाटील

शिवलीला पाटीलच्या किर्तनाचे आयोजन आले अंगलट, गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देऊळगाव राजा (जि. बुलडाणा) : जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून कीर्तनाच्या कार्यक्रमात गर्दी जमविणे दुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना अडचणीचे ठरले असून तिघाविरुद्ध पोलिसांनी (buldana police) गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान बिगबॉस फेम हभप. शिवलिला पाटील यांच्या कीर्तनास जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाने विरोध दर्शविल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. मात्र, आयोजक आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

हेही वाचा: २५ वर्षीय तरुणाचा विधवेवर बलात्कार, एकटी राहत असल्याचा गैरफायदा

याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त गर्दी जमवू नये, असे आदेश बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी दिलेले असताना देऊळगाव मही येथील राजमाता जिजाऊ दुर्गा मंडळ यांच्या वतीने ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. सदर कीर्तनास भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. देऊळगाव मही येथील मंडळातर्फे आयोजित सदर कीर्तनाच्या कार्यक्रमास दोनशेच्यावर महिला पुरुषांनी गर्दी केली. यासंदर्भात पोलिस उपनिरीक्षक किरण खाडे यांनी सरकारतर्फे पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून मंडळाचे आयोजक संदीप विजय राऊत वय २५, गणेश साहेबराव गोरे व किशोर शालिकराम पोफळकर सर्व राहणार देऊळगाव मही यांच्याविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.

बिग बॉसफेम हभप शिवलीलाताईना विरोध -

कीर्तनकार हभप शिवलीलाताई पाटील यांनी बिग बॉस नावाच्या शो मध्ये एन्ट्री केली होती. त्यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम देऊळगाव मही येथे होणार असल्याचा प्रचार झाल्यानंतर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाने बिग बॉस फेम शिवलीला पाटील यांचा निषेध करीत सदर कीर्तनाचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी आयोजकांकडे केली. बिग बॉस हा शो पाश्चात्य संस्कृतीचे दर्शन घडविणारा असून यामध्ये एन्ट्री करून हरीभक्त पारायण या सन्मानाचा अवमान झाला असल्याची भूमिका वारकरी संप्रदायाने व्यक्त करीत सदर कीर्तनाच्या कार्यक्रमास विरोध दर्शविला. तरीही आयोजकांनी मात्र माघार घेतली नाही. ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले व कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. 

शिवलीलाने भूमिका केली स्पष्ट -

बिग बॉसमध्ये गेले ही माझी चूक. मात्र, आपल्या धर्माची संस्कृती आपल्या संप्रदाय माझे कीर्तन माझी तुळशी माय अख्ख्या महाराष्ट्राला दिसावी म्हणून मी बिग बॉसमध्ये गेले. मात्र, तिथं राहून मी वारकरी संस्कृतीचे दर्शन घडविले. मी अभंगावर बोलले. ज्ञानेश्वरी वाचन तुळशी पूजन सोडले नाही. वारकरी संस्कृती जपूनच बिग बॉसच्या घरात राहिले असल्याची माहिती कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांनी आपल्या कीर्तनाच्या सुरुवातीला दिली. दरम्यान एक मुलगी एक महिला कीर्तनकार असल्याचा विरोध होत असल्याची टीका त्यांनी यावेळी बोलताना केली आहे.

सदर कीर्तनाच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचा विरोध झाला. सदर कार्यक्रम रद्द करण्यात यावा याबाबत आमच्यावर दबाव टाकण्यात आला. विविध अडचणी निर्माण झाल्या. मात्र, धार्मिक कार्यक्रमांसाठी महाराज लोकांनी विरोध करू नये.
-संदीप राऊत, आयोजक दुर्गा उत्सव मंडळ
loading image
go to top