esakal | यंदा सोयाबीन पेरणीला प्रथम पसंती
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा सोयाबीन पेरणीला प्रथम पसंती

यंदा सोयाबीन पेरणीला प्रथम पसंती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः गत खरिपात सोयाबीनचे उत्पादन घटले असले तरी, हाती आलेल्या उत्पादनाला बाजार समितींमध्ये यंदा हमीभावापेक्षा दुप्पट भाव मिळाल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या येत्या खरिपात अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे खरीप २०२१ मध्ये सोयाबीन पिकाचा पेरा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सोयाबीन हे अकोला जिल्ह्यासह विदर्भात खरिपातील प्रमुख पीक आहे. दरवर्षी दोन ते सव्वादोन लाख हेक्टरवर जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी होते. यावर्षी सुद्धा कृषी विभागाने सव्वादोन लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणीचा अंदाज बांधला आहे. परंतु, कधीनव्हे एवढा भाव सोयाबीनला यावर्षी मिळाल्याने पुढील हंगामात निघणाऱ्या सोयाबीन उत्पादनालाही चांगलाच भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. त्यामुळे कृषी विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा अधिक क्षेत्रावर यंदा सोयाबीनची पेरणी होण्याची शक्यता आहे.

घरचेच बियाणे वापरा

गतवर्षी नामांकित कंपन्यांचे महागडे बियाणे न उगवल्याचा व बोगस बियाण्यांच्या शेतकऱ्यांकडून प्राप्त तक्रारी लक्षात घेता शेतकऱ्यांनी येणाऱ्या खरिपात घरच्या सोयाबीन बियाण्याचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तसा ठरावही जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या सभेत घेण्यात आला होता.

सर्वाधिक साेयाबीनची मागणी

गेल्या खरिपात अतिवृष्टी व अवकाळी पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनचे उत्पादन मोठ्या फरकाने घटले. परंतु, हाती आलेल्या सोयाबीनला यावर्षी बाजारात आजपर्यंतचा उचांकी भाव मिळाला. सध्याही प्रतिक्विंटल सात ते आठ हजार भाव मिळत आहे. वाढती मागणी व मिळत असलेले भाव लक्षात घेता येत्या खरिपात सोयाबीन पेरणीवरच शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर राहील, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यानुसार नियोजन आखत, एकूण बियाणे मागणीत सर्वाधिक दोन लाख १२ हजार ७०० क्षेत्रावर सोयाबीन पेरणीकरिता ३३ हजार ९९९ क्विंटल सोयाबीन बियाण्याची मागणी कृषी विभागाने आयुक्तालयाकडे केली आहे.

भरपूर पर्जन्यमानाचेही संकेत

हवामान विभागाने यावर्षी मॉन्सूनमध्ये समाधानकारक म्हणजे सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडणार असून, महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भात पोषक मॉन्सूनचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांचा सोयाबीन पेरणीवर भर राहू शकतो.

संपादन - विवेक मेतकर

loading image
go to top