esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

akola

नळगंगा धरणाचे पाच दरवाजे उघडले

sakal_logo
By
शाहीद कुरेशी

मोताळा : जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पात समावेश असलेला नळगंगा धरण संततधार पावसामुळे मंगळवारी (ता.५) सकाळी साडे सात वाजता शंभर टक्के भरला आहे. दरम्यान, नळगंगा धरणाचे पाच दरवाजे दहा सेंटीमीटरने उघडण्यात आले असून, दुपारपर्यंत १३९१ क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू होता. धरणात पाण्याची आवक पाहता विसर्ग कमी किंवा जास्त करणार असल्याची माहिती आहे.

मोताळा तालुक्यातील नळगंगा धरणातून मोताळा, मलकापुर व नांदुरा तालुक्यातील शंभरावर गावांची तहान भागविल्या जाते. तर, परिसरातील शेकडो हेक्टर शेतीला सिंचनासाठी फायदा मिळतो. नळगंगा धरणातील जलाशयाची पूर्ण संचय पातळी २९४.४४ मीटर आहे. या धरणाची लेवल ६६ फूट असून, हा प्रकल्प शंभर टक्के भरल्यानंतर यातील उपयुक्त जलसाठा ६९.३२ दलघमी इतका असतो.

मागील काही दिवसांपासून तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मंगळवारी (ता.५) सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास नळगंगा प्रकल्प शंभर टक्के भरला. धरणात पाण्याची आवक पाहता सुरवातीला धरणाचे तीन वक्रद्वार पाच सेंटीमीटरने उघडून नळगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.

परंतु धरणात पाण्याची आवक वाढत होती. त्यामुळे दुपारी १२ वाजताच्या सुमारास नळगंगा धरणाचे पाच दरवाजे दहा सेंटीमीटरने उघडण्यात आले. दुपारी तीन वाजेपर्यंत १३९१ क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू होता. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती शाखा अभियंता एस.एस. नागरे यांनी दिली आहे.

loading image
go to top