त्रिसूत्रीचे पालन करीत जगा कोरोनासोबत 

भगवान वानखेडे 
Sunday, 12 July 2020

कोरोना हरविण्यासाठी त्रिसूत्री येणार कामी ः पालन करून आता स्वत: सज्ज व्हा! 

अकोला ः जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण संख्या दोन हजाराच्या जवळ जाऊन पोहचली आहे. समूह संसर्ग झाल्याचेही आता स्पष्टच होत आहे. समूह संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा कामी लागली असली तरी सततची संचारबंदी, लॉकडाउन हा काही कायमस्वरूपी उपाय नाही. त्यामुळे लॉकडाऊनंतर पुढे काय, या प्रश्नाचे उत्तर म्हणजे कोरोनाच्या लढाईसाठी फिजीकल डिस्टन्स, मास्क लावणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे या त्रिसूत्रीवर भर द्यावा लागणार आहे. 

जिल्ह्यात कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणा ही प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे अधिक लक्ष देण्यात व्यस्त होती. हळूहळू रुग्ण सापडू लागल्यानंतर या उपाययोजना अधिक गतीने होत गेल्या. यात अगदी गावपातळीवर बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांची माहिती जमा करण्यासाठीचे सर्वेक्षण अनेकदा आशा, अंगणवाडी कार्यकर्तींमार्फत केले असून अजूनही ते सुरूच आहे. मात्र, आता कोरोनाला घाबरून घरातच बसण्याचे दिवस आता संपत आले आहेत. त्यामुळे नागरिकांना आता कोरोनासोबतचे जीवन स्वीकारले आहे. अनेकांना नोकरी, व्यवसाय, रोजगारासाठी घराबाहेर पडणे क्रमप्राप्त आहे. जगताना स्वत:सह आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोरोना होणार नाही याची काळजी घेण्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे. 

आता कोरोनाला हरविणारी त्रिसूत्री 
1 कमीत कमी लोकांच्या संपर्कात येऊन काम करा, जरी काही कामानिमित्त संपर्क येत असेल तर शारीरिक अंतर ठेवा.

2 सॅनिटायझर सोबत ठेवा, बाहेर फिरताना हात अनेक ठिकाणी लागतो. हात डोळे, तोंड, नाक यांना लागल्यास धोका होऊ शकतो. त्यामुळे वारंवार हात धुवा किंवा ते सॅनिटायझरने निर्जंतुक करा. 

3 अनावश्‍यक घराबाहेर पडू नका, घरात बसून जी कामे तंत्रज्ञानाचा आधार घेऊन करता येण्यासारखी आहेत ती घरूनच करा. नोकरी, व्यवसाय, रोजगार या मुळे घराबाहेर जाणे आवश्‍यकच असेल तर मास्कचा वापर करा. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Follow the Trisutri with Corona