माजी आमदार बाजोरिया शिंदे गटात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Former MLA Bajoria in Shinde group

माजी आमदार बाजोरिया शिंदे गटात!

अकोला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ५० आमदारांच्या गटासोबत अकोला जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी गळाला लावण्याच्या दृष्टीने शिंदे गटाकडून अकोला जिल्ह्यात चाचपणी करण्यात आली होती. या चाचपणीत माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि त्यांचे आमदार पूत्र विप्लव बाजोरिया हे गळाला लागले आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेत असलेल्या गटबाजीचा फायदा घेत नाराजांना गळाला लावण्याचा प्रयत्न यशस्वी झाला असल्याची चर्चा शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आहे.

शिवसेनेतील गटबाजी गेले काही वर्षांपासून उघडपणे दिसून आली आहे. जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख यांच्याकडे जिल्ह्याचा प्रभार आल्यापासून माजी आमदार गाेपीकिशन बाजाेरीया व आमदार देशमुख यांच्यात उभी फुट पडली आहे. माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांचे समर्थकांचाही एक गट आहे. या गटांकडून एकमेकांना काेंडीत पकडण्याची एकही संधी सोडली जात नाही. गतवर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही ही गटबाजी उघडपणे दिसून आली. परिणामी शिवसेनेचे उमेदवार आमदार बाजाेरीया यांना भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

या पराभवानंतर जिल्ह्यातील शिवसेनेत पडलेली दरी कमी करम्यासाठी पक्ष श्रेष्ठींकडून कोणतेही प्रयत्न झाले नाही. उलटपपक्षी आमदार नितीन देशमुख यांच्या गटातील जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांच्याकडे तीन विधानसभा मदरासंघाचे जिल्हाध्यक्षपदी सोपविण्यात आले. त्यामुळे बाजोरिया आणि देशमुख गटातील दरी आणकीच वाढली आहे. त्यातच सुरुवातीला आमदार नितीन देशमुख हे एकनाथ शिंदे गटासोबत सुरत गेले होते. मात्र, नंतर ते गुवाहाटीवरून अकोल्याला परत आले होते. त्यानंतर आमदार देशमुख यांनी शिंदे यांच्यावर आरोपही केले होते. त्यामुळे शिंदे गटाकडून अकोला जिल्ह्यातील शिवसेनेतील गटबाजीचा फायदा घेतला जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यादृष्टीने शिंदे गटातून जिल्ह्यात चाचपणी करण्यात आल्यात आली होती. अखेर मुंबईत माजी आमदार बाजोरिया यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत झाली भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून अकोला जिल्ह्यातील माजी आमदाराला गळाला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासंदर्भात सध्या मुंबईत अससेल्या या माजी आमदारांची शिंदे गटातील नेत्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती आहे. निर्णय घेण्यासाठी वेळ मागितला होता. यासंदर्भात शिवसेना नेते व या माजी आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. आमदार विप्लव बाजोरिया यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांकडून या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

कोणता झेंडा घेवू हाती?

भाजप व शिवसेना युती असल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजय कठीण आहे. त्यामुळे सध्या शिवसैनिकांची घालमेल सुरू आहे. शिवसेनेसोबत राहिलो तर एकटे लढवे लागू शकते. शिंदे गटासोबत गेलो तर भाजपसोबतच्या युतीचा फायदा होईल, अशी आशा आहे. त्यामुळे कोणता झेंडा घेवू हाती, अशी अवस्था सध्या शिवसैनिकांची झाली आहे.