esakal | बंजारा नेतृत्व स्पर्धेत हरिभाऊ राठोडांची एन्ट्री : मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र; आश्वासनाची करून दिली आठवण
sakal

बोलून बातमी शोधा

Former MP Haribhau Rathore has entered the Banjara leadership competition

राठोड यांच्या राजीनाम्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर 'वन टू वन' चर्चा करण्यासाठी वेळ मागणारे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

बंजारा नेतृत्व स्पर्धेत हरिभाऊ राठोडांची एन्ट्री : मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र; आश्वासनाची करून दिली आठवण

sakal_logo
By
राम चौधरी

वाशीम : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी राज्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेली बंजारा समाजाच्या नेतृत्वाची राजकीय पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न भाजप - कॉंग्रेस - शिवसेना असा राजकीय प्रवास करणारे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सुरू केला आहे. 

राठोड यांच्या राजीनाम्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर 'वन टू वन' चर्चा करण्यासाठी वेळ मागणारे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राज्याचे माजी वनमंत्री तथा बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांच्याकडून राजीनामा घेऊ नये, यासाठी बंजारा समाजाने सरकारवर दबाव आणला होता. मात्र संजय राठोड पायउतार झाले. त्यामुळे आता भाजप, काँग्रेस ते शिवसेना हितचिंतक असा राजकीय वळसा घेतलेले हरिभाऊ राठोड हे आता शिवसेनेच्या गोटात जाऊन रिक्त झालेल्या वनमंत्री पदावर दावा करीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

या पत्रात हरिभाऊ राठोड यांनी निधानसभा निवडणुकीतील शिवसेनेच्या विजयात त्यांचा कसा सहभाग होता, याची माहिती दिली आहे. सोबतच तुम्ही मला सत्तेत वाटा देऊ, असे जाहीर आश्वासन दिल्याचे पत्रात नमूद करून अप्रत्यक्षपणे संजय राठोड यांचे रिक्त झालेले मंत्रिपद त्यांना द्यावे, असेच सूचित केले आहे.
 
हरिभाऊ राठोड हे भारतीय जनता पक्षाचे यवतमाळ लोकसभेचे खासदार होते. मात्र त्यांनी नंतर काँग्रेसमध्ये कोलांट उडी मारली. काँग्रेसने त्यांना विधानपरिषदेची आमदारकीही बहाल केली होती. मात्र दुसऱ्या विधानपरिषद निवडणुकीत त्यांना काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने आता ते शिवसेनेच्या मांडवाखाली आसरा घेण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. 

बंजारा नेतृत्वासाठी चढाओढ 

राज्यामध्ये एक कोटीपेक्षा जास्त बंजारा समाजाची लोकसंख्या आहे. दहा वर्षांपूर्वी बंजारा समाजाचे नेतृत्व पुसदच्या नाईक घराण्याकडेच होते. मात्र दहा वर्षात संजय राठोड यांचा राजकीय उदय झाला. त्यामुळे समस्त बंजारा समाजाचे नेतृत्व संजय राठोड यांच्याकडेच गेले. आता पुन्हा संजय राठोड पायउतार झाल्यानंतर हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामागे, समाजाचे नेतृत्व कोणी करावे, ही मुख्य मेख असल्याची चर्चा आहे. 

loading image