शेतकऱ्यांसाठी खुशखबर...गाजरगवताचे निर्मुलन शक्य! अकोला जिल्ह्यात प्रयोग यशस्वी

अनुप ताले
Tuesday, 1 September 2020

दिग्रस बु. येथील प्रयोगशिल शेतकरी राजेंद्र ताले यांनी काही शेतकऱ्यांसह भुंग्याच्या उपयोगितेतून गाजरगवताच्या निर्मुलनाचा प्रयोग पातूर तालुक्यात पहिल्यांदाच राबविला. नैसर्गिक पद्धतीने गाजरगवताचे निर्मुलन करण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता आणि वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी येथे त्यांच्या या विचाराला चालना मिळाली होती. 

अकोला : शेतकऱ्यांची सर्वात मोठी डोखेदुखी म्हणजे ‘गाजरगवत’! आणि ही डोकेदुखी दूर करण्यासाठी पातूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी परभणी कृषी विद्यापीठातून सात हजार मेक्सिकन भुंगे विकत आणून, त्यांच्या शेतात व गावपरिसरात सोडले होते. अवघ्या काही दिवसातच या सात हजार भुंग्यांपासून लाखो भुंग्यांची उत्पत्ती झाली व त्यांनी परिसरातील गाजगगवताची चक्क चाळणी केली आहे. पहिलाच प्रयोग यशस्वी झाल्याने येथील शेतकरी आनंदी असून, जिल्ह्यात सर्वच शेतकऱ्यांनी तो राबवावा, असे आवाहन दिग्रस बु. येथील शेतकरी राजेंद्र ताले यांनी केले आहे.

दिग्रस बु. येथील प्रयोगशिल शेतकरी राजेंद्र ताले यांनी काही शेतकऱ्यांसह भुंग्याच्या उपयोगितेतून गाजरगवताच्या निर्मुलनाचा प्रयोग पातूर तालुक्यात पहिल्यांदाच राबविला. नैसर्गिक पद्धतीने गाजरगवताचे निर्मुलन करण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता आणि वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी येथे त्यांच्या या विचाराला चालना मिळाली होती. ‘झायग्रोग्रामा (मेक्सिकन) नावाचा भुंगा केवळ गाजरगवतावर उपजीविका करतो याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांचेसह गावातील नंदराज ताले, समाधान भालतिडक, हिंगणा येथील नितीन उजाडेल, राहेर येथील आकर्षण काळे, शिर्ला येथील सचिन कोकाटे, मोरखडे व आलेगाव येथील अक्षय जैन यांनी ३० जुलै रोजी परभणीवरून सात हजार मेक्सिकन भुंगे आणले व ते ३१ जुलै रोजी त्यांच्या शेतात व गावपरिसरात सोडले. आजमितीला मात्र त्यांची डोखेदुखी आनंदात परिवर्तीत झाली असून, केवळ एका महिन्याच्या कालावधीत सात हजार भुंग्यांपासून लाखो भुंगे उत्पादीत झाले असून त्यांनी अख्ख्या गाजरगवताची चाळणी केल्याचे व पहिलाच प्रयोग यशस्वी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.

 

असे होते गाजरगवताचे निर्मुलन
गाजरगवतावर उपजीविका करणारा हा झायगोग्रा भुंगा मेक्सिकोतून आयात करण्यात आला आहे. त्यांना त्रिशूल भुंगे असेही म्हणतात. मादी भुंगे साधारणपणे २००० अंडी घालतात. पावसाळ्यात जून ते ऑक्टोबरपर्यंत हे भुंगे गाजरगवत फस्त करतात. हे भुंगे फक्त गाजरगवतावरच जगतात. गाजरगवत उपलब्ध नसल्यास ते जमिनीत सुप्तावस्तेत सात ते आठ महिने दडून बसतात आणि पावसाळा सुरू होताच बाहेर पडून गाजरगवतावर ताव मारतात.

 

सात हजाराचे झाले लाखो भुंगे
मी व लगतच्या परिसरातील काही शेतकरी बांधवांनी ३० जुलै रोजी परभणी विद्यापीठातून ७००० मेक्सिकन भुंगे स्वखर्चाने विकत आणून आपापल्या शेतात, गावपरिसरात व स्मशानभूमित गाजरगवतावर सोडले होते. एका महिन्यात त्यांचे लाखो भुंगे तयार झाले व त्यांनी गाजरगवताची चक्क चाळणी केली आहे.
- राजेंद्र ताले, शेतकरी, दिग्रस, तालुका पातूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gajar grass eradication experiment successful in Akola district