जागतिक सिकलसेल दिन : सिकलसेलमुक्त रहायचे आहे तर विवाहापूर्वी ही काळजी घेणे आवश्‍यक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

सिकलसेलची माहिती देताना तज्ज्ञ सांगतात की, सिकलसेल हा एक प्रकारे हिमोग्लोबिनचा आजार असून जनुकीय दोषांमुळे रक्तांच्या पेशींमध्ये हिमोग्लोबिनचा दोष निर्माण होतो.

अकोला : रक्ताशी संबंधित सिकलसेल आजाराला रोखण्यासाठी विवाहयोग्य गटातील स्त्री-पुरुषांनी आवर्जून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने आजच्या जागतिक सिकलसेल दिनानिमित्त करण्यात येत आहे.

सिकलसेलची माहिती देताना तज्ज्ञ सांगतात की, सिकलसेल हा एक प्रकारे हिमोग्लोबिनचा आजार असून जनुकीय दोषांमुळे रक्तांच्या पेशींमध्ये हिमोग्लोबिनचा दोष निर्माण होतो. यामध्ये ऑक्सिजन कमतरतेमुळे लाल रक्तपेशी विळ्याच्या आकाराच्या होतात. केवळ रुग्णाला पाहून किंवा नाडीची चाचणी करून या आजाराचे निदान होत नाही, त्यामुळे रक्त तपासणीचे आवाहन करण्यात येत आहे. 

रक्ताच्या प्राथमिक तपासणीला सोल्युबिलीटी तपासणी म्हणतात यामध्ये रुग्ण सकारात्मक आढळल्यास सदर व्यक्तीची हिमोग्लोबीन इलेक्ट्रोफोरसिस ही विशिष्ट चाचणी करून निदान करण्यात येते, अशी तज्ज्ञांची माहिती आहे. सिकलसेल हा अनुवांशिक आजार असून काही विशीष्ट घटकांमध्ये हा रोग अधिक प्रमाणात आढळतो, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

दोन प्रकारचे रुग्ण
हा आजार जनुकीय दोषामुळे होत असल्याने तो आनुवंशिक आहे. आई- वडिलांकडून मुलांना हा आजार होतो. यामध्ये दोन प्रकारचे रुग्ण असतात. एक प्रकार म्हणजे सिकलसेल वाहक आणि दुसरा सिकलसेल पीडित असतो. वाहक व्यक्ती ही केवळ आजाराची वाहक असते. या व्यक्तीत आजाराची लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळेच सिकलसेल वाहक किंवा पीडित व्यक्तीने वाहक किंवा पीडित व्यक्तीशी लग्न केल्यास त्यांच्या होणाऱ्या अपत्यातही सिकलसेल गुणधर्म आढळू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात.

ही आहेत लक्षणे

  • रक्तवाहिन्यांमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव होणे
  • रुग्णाचे हातपाय खूप दुखणे
  • रोगप्रतिकार शक्ती कमी होणे
  • दम लागणे, कावीळ होणे
  • ऑक्सिजनच्या अभावाने तीव्र वेदना होणे

निदान झाल्यानंतर पुढचे धोके टळतात
सिकलसेलचे लग्नापूर्वीच निदान झाले तर संबंधित रुग्ण वाहक की, पीडित याचे निदान होते. निदान झाल्यानंतर पुढचे धोके टाळता येतात. लग्नापूर्वी चाचणी केल्यास सिकलसेलमुक्त पिढी जन्माला येईल. त्यामुळे ही तपासणी आवश्यक ठरते. सिकलसेलचे निदान झाल्यास नीट उपचारही घेतला जातो.
- डाॅ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Get checked before marriage to get rid of sickle cell in akola