esakal | रखरखत्या अकोल्यात बहरतोय ‘भुईमूग’
sakal

बोलून बातमी शोधा

Groundnut is growing in Akola

रखरकता उन्हाळा अन् पाण्याची टंचाई यामुळे जिल्ह्यात उन्हाळी पिके जणूकाही लुप्तच झाली होती. यावर्षी मात्र, मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने, बहुतांश भागात उन्हाळी पिकांची लागवड झाली असून, सुमारे तीन हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर भुईमुगाची पेरणी करण्यात आली आहे.

रखरखत्या अकोल्यात बहरतोय ‘भुईमूग’

sakal_logo
By
अनुप ताले

अकोला  ः रखरकता उन्हाळा अन् पाण्याची टंचाई यामुळे जिल्ह्यात उन्हाळी पिके जणूकाही लुप्तच झाली होती. यावर्षी मात्र, मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने, बहुतांश भागात उन्हाळी पिकांची लागवड झाली असून, सुमारे तीन हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर भुईमुगाची पेरणी करण्यात आली आहे.
विस्कटलेले ऋतूचक्र अन् त्यामुळे लांबलेले पीक हंगाम, याचा जिल्ह्यातील एकंदरीत शेती उत्पादनावर परिणाम झाला आहे. मॉन्सूनचे उशिरा आगमन, पावसाचा दीर्घ खंड, अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी पाऊस, कमी दिवसांचा पावसाळा, हिवाळ्यात थंडी गुल अन् आग ओकणारा उन्हाळा, यामुळे दरवर्षी खरीप, रब्बी व उन्हाळी पिकांची घडी विस्कटलेलीच असते. खरीप व रब्बीत मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याने व सिंचनाची उपलब्धता नसल्याने उन्हाळी पिके तर लुप्तच होत आली आहेत. मात्र, गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जवळपास २२ टक्के जास्त पाऊस पडल्याने जमिनीत व जलसाठ्यांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध आहे. या एका सकारात्मक बाबीमुळे यावर्षी जिल्ह्यात उन्हाळी पिकांची बऱ्यापैकी पेरणी करण्यात आली आहे. त्यामध्ये आनंदाची बाब म्हणजे दमदार व भरघोस उत्पादन क्षमता असलेल्या आणि इतर पिकांच्या तुलनेच अधिक उत्पन्न देणाऱ्या भुईमूग पिकांचा पेरा वाढला असून, जवळपास तीन हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.

पेरणी व उत्पादकता
जिल्ह्यात भुईमूग पिकाचे क्षेत्र वाढत आहे. कृषी विभागाच्या नोंदणीनुसार जिल्ह्यात २१०० हेक्टरवर भुईमुगाचे पेरणी क्षेत्र असून, प्रतिहेक्टरी २७६४ किलो उत्पादकतेनुसार जवळपास ५८००.५१ टन उत्पादन होते. जिल्ह्यात टीएजी २४ या वाणाचे सर्वाधिक लागवड क्षेत्र असून, या वाणापासून एकरी २५.८२ क्विंटल उत्पादन मिळू शकते.

येथे सर्वाधिक पेरणी व बाजारपेठेची उपलब्धता
जिल्ह्यात अकोला तालुक्यातील काही भाग व बार्शीटाकळी, पातूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भुईमूग पेरणी होत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अकोला व बार्शीटाकळी येथे चांगली बाजारपेठ उपलब्ध असून, अनेक शेतकरी त्यांचा माल थेट तेलघाण्यावर सुद्धा विकत आहेत.

शेततळे, विहिरी, कुपनलिका, कॅनॉल इत्यादी जलसाठ्यांची जिल्ह्यात निर्मिती झाल्याने व त्यामध्ये पाण्याची उपलब्धता झाल्याने भुईमुगाचा पेरा वाढला आहे. शिवाय बाजारपेठेत अनेक छोट्या-मोठ्या तेलघाण्या लागल्यामुळे व जवळच बाजारपेठ उपलब्ध असल्याने शेतकरी भुईमूग लागवडीवर आता भर देत असून, यावर्षी जवळपास अडीच ते तीन हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.
- कुलदीप देशमुख,
विषय विशेषज्ञ, कृषिविद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र, अकोला

दुहेरी उत्पन्न देणारे पीक
भुईमूग पिकापासून शेंगाचे उत्पादन तर मिळतेच परंतु, गाई-म्हशींचे दूध वाढविण्यासाठी या पिकाच्या पालापाचोळ्याची, पानाची, चारा म्हणून विशेष मागणी असते. त्यामुळे शेंगा व चारा अशा दुहेरी स्वरुपात या पिकापासून उत्पन्न मिळू शकते.

loading image