esakal | अर्धा जिल्हा कोरडाच; तेल्हारा, अकोट, बार्शीटाकळी, बाळापुरात दमदार हजेरी
sakal

बोलून बातमी शोधा

अर्धा जिल्हा कोरडाच; तेल्हारा, अकोट, बार्शीटाकळी, बाळापुरात दमदार हजेरी

अर्धा जिल्हा कोरडाच; तेल्हारा, अकोट, बार्शीटाकळी, बाळापुरात दमदार हजेरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः मॉन्सूनची सुरुवात झाल्यानंतर मृग नक्षत्रात झलक दाखवून दडी मारणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले होते. जिल्ह्यातील ५० टक्के क्षेत्रावरील पीक धोक्यात आले असतानाच जिल्ह्यात आशेचा किरण उगवला तो बुधवारी रात्रीपासून. मात्र, अर्धा जिल्हा अद्यापही कोरडाच आहे. गुरुवारी दुपारनंतर जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट, बार्शीटाकळी आणि बाळापूर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. अकोला शहरात तुरळ पाऊस झाला. (Heavy rains in Telhara, Akot, Barshitakali, Balapur)


गेले काही दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. बुधवारपासून मात्र पावसाचे वातावरण झाले. बुधवारी रात्री अकोला शहरासह मूर्तिजापूर तालुक्यात काही ठिकाणी पाऊस झाला. मात्र,या पावसाला सार्वत्रिक स्वरूप नव्हते. गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने जिल्ह्यात सर्वदूर पावसाची शक्यता वर्तविली जात होती. दुपारनंतर उत्तरेकडून दाटून आलेल्या ढगांसोबत जोरदार वारे वाहू लागल्याने दमदार पावसाची शक्यता होती.

मात्र, अकोला शहर व परिसरात तुरळक सरी कोळसून ढग पुढे निघून गेले. मात्र, तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी, अकोट या तालुक्यात दमदार पाऊस झाला. अकोट तालुक्यात दुपारी एक तास बरसलेल्या पावसाने चिंतातूर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. तेल्हारा तालुक्यातही सर्वदूर पाऊस झाला. बाळापूर तालुक्यात काही मंडळात चांगला पाऊस झाला. बार्शीटाकळी शहर व तालुक्यातील महान, पिंजर, महागाव, पुणोती, दगडपारवा आदी परिसरात दुपारी २ वातपासून पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाच्या सरी पडत होत्या. जिल्ह्यातील वलभनगर, वणी रंभापूर, दहीहंडा, पोपटखेड, सौंदळा, अडगाव खुर्द, अडगाव बु., मुडगाव, पंचगव्हाण, हातरुण, मांजरी, व्याळा, रिधोरा, हिवरखेड, दानापूर, वरूड बिहाडे आदी परिसरातही पावसाने दमदार हजेरी लावली.

मूर्तिजापूर, पातुरात ढगाळ वातावरण
जिल्ह्यात सर्वदूर पावसाचे वातावरण झाले तरी मूर्तिजापूर व पातूर तालुक्यात मात्र गुरुवारी पाऊस झाला नाही. मूर्तिजापूर तालुक्यात बुधवारी रात्री पावसाने हजेरी लावली होती. पातूर तालुक्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. गुरुवारी दिवसभर ढग दाटून आले होते. मात्र, पाऊस झाला नाही.

पिकांना मिळणार जीवदान
अकोला जिल्ह्यातील ५० टक्के क्षेत्रावरील पेरण्या मागील १५ दिवसांत आटोपल्या होत्या. मात्र, या काळात पाऊसच नसल्याने बिजांकूर कोमेजले होते. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले होते. गुरुवारी झालेल्या पावसाने काही तालुक्यात दुबार पेरणीचे संकट टळण्याची शक्यता आहे. मात्र, सार्वत्रिक पाऊस न आल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागू शकते.

Heavy rains in Telhara, Akot, Barshitakali, Balapur

loading image