हाॅटेल्स रेस्टाॅरंट चालकांच्या चुकीवर राहणार लक्ष

भगवान वानखेडे 
Monday, 3 August 2020

अनुचित प्रकार आढळल्यास होणार कारवाई ः  अद्यापही गाईड लाईन्सची प्रतीक्षा

अकोला  ः कोविडच्या अनलाॅक दोनमध्ये प्रवेश करताच शासनाच्या विविध गाईड लाईन्स जिल्हा पातळीवर प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये पाच आॅगस्टपासून राज्यभरातील खाद्यगृहे रेस्टाॅरंट उघडणार असल्याचे नमुद आहेत. मात्र, आद्यपही या हाॅटेल्स रेस्टाॅरंटची तपासणी करण्यात आली नसून, उघडल्यानंतर त्यांच्या चुकांवर लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती अन्न व औषध विभागाने दिली आहे. 

राज्यभरातील सर्व प्रकारचे मॉल्‍स व मार्केट कॉम्‍प्‍लेक्‍स, खाद्यगृहे , रेस्‍टॉरेन्‍ट वगळता  ५ ऑगस्टपासून  सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत सुरू राहणार आहेत. तथापी अशा मॉल्‍स व मार्केट कॉम्प्लेक्‍समधील असलेली रेस्‍टॉरेंट मधील किचन व खाद्यगृहे यांना घरपोच सेवा देण्‍याकरिता परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अकोल्यासह राज्यभरातील या हाॅटेल्स, रेस्टाॅरंट, खाद्यगृहे चार महिन्यानंतर उघडणार असले तरी त्या संचालकांची तपासणीसह प्रतिष्ठाणाचे निर्जंतुकीकरण करण्याच्या अद्यापही कुठल्याही गाईड लाईन्स प्राप्त झाल्या नसल्याची माहिती आहे. तेव्हा नागरिकांनीच आपली काळजी घेऊन हाॅटेल्स रेस्टाॅरंटमध्ये जावे असे आवाहन करण्यात आले आहे.

आधी मिटींग घेऊ नंतर लक्ष ठेऊ
अन्न व औषध विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हाॅटेल्स, रेस्टाॅरंट चालकांची आधी बैठक बोलावून त्यांना कोविड काळात कसे वागले पाहिजे, ग्राहकाना कशी सेवा दिली पाहीजे याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर ते कसे व्यवहार करतात त्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

15 स्वीट मार्टची तपासणी
अनलाॅकमध्ये स्वीट मार्ट सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सुरू असलेल्या 15 स्वीट मार्टची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती आहे. मात्र, उर्वरीत स्वीट मार्टवरही लक्ष असणे गरजेचे आहे. 

तपासणी किंवा निर्जंतुकीकरणाच्या अशा कुठल्याही गाईड लाईन्स आल्या नाहीत. मात्र, तरीही हाॅटेल्स, रेस्टाॅरंट चालकांची बैठक बोलावली असून, त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.  
-सागर तेरकर, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, अकोला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hotels will focus on the mistakes of restaurant operators