esakal | मुबलक साधनच नाहीत तर मग वाढणारच ना मृत्यूदर
sakal

बोलून बातमी शोधा

c0481846-wuhan_novel_coronavirus_illustration-spl.jpg

अकोल्याच्या मृत्युदर राज्यपेक्षाही दुप्पट ः 46 मृत्यूने वाढविली चिंता

मुबलक साधनच नाहीत तर मग वाढणारच ना मृत्यूदर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः राज्यात कोरोनाने थैमान घातले असून, आतापर्यंत साडेतीन हजाराहून अधिक रूग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तर अकोला जिल्ह्यात दररोज एकाचा बळी जात असून, आतापर्यंत 46 जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत अकोल्यातील मृतकांची संख्या कमी असली, तरी येथील मृत्यूचा दर राज्याच्या दुप्पट असल्याची भयावह स्थिती आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही लक्षणीय आहे. त्यामुळे मोठा दिलासाही मिळत आहे. पण, यासोबतच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यू हा चिंतेचा विषय आहे. राज्यात साडे तीन हजाराहून अधिक रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. त्यानुसार, राज्यातील मृत्यूदर हा 3.6 येवढा आहे. मात्र, या तुलनेत अकोला जिल्ह्यातील मृत्यूदर 4.7 असा आहे. अकोला जिल्ह्याचा हा मृत्यूदर राज्याच्या तुलनेत जास्त आहे. वास्तविक पाहता राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोला जिल्ह्यातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कमी आहे; मात्र येथे दररोज एकाचा बळी जात असल्याने जिल्ह्यातील स्थिती चिंताजनक आहे. मृत्यूचे हे प्रमाण रोखण्यासाठी प्रशासनाने वेळीच आवश्यक पावले न उचलल्यास जिल्ह्याची परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इतर आजार असणाऱ्या रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. परंतु, या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त मधुमेह, निमोनिया, हृदयविकार, उच्चरक्तदाब असेही आजार असल्याची माहिती अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

आवश्‍यक उपकरणांचा तुटवडा
येथील सर्वोपचार रुग्णालयात कधी पीपीई कीट तर कधी व्हेंटीलेटरची कमतरता अशातच आता आॅक्सिजनचाही साठा मुबलक प्रमाणात नसल्याचे दिसून येत आहे. तेव्हा ही आवश्‍यक असणाऱ्या साधनांचाच तुटवडा असल्यास मृत्यूदर वाढीला कारणीभूत तर ठरणारच असल्याचे बोलले जात आहे.

एकाच दिवशी दोन महिलांचा मृत्यू
दरम्यान शनिवारी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही मयत महिला असून, त्यातील एक 52 वर्षीय महिला आहे. ही महिला अकोट फैल येथील रहिवासी असून 10 जून रोजी दाखल झाली होती. तिचा 12 जून रोजी रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर अन्य महिला ही 80 वर्षीय महिला असून, ही महिला देशपांडे प्लॉट जुनेशहर येथील रहिवास्सी आहे. ही महिला 8 जून रोजी दाखल झाली होती. आज सकाळी तिचा मृत्यू झाला.