आजाराची माहिती लपवाल तर होणार गुन्हा दाखल

भगवान वानखेडे 
Friday, 10 July 2020

आतापर्यंत दोघांवर गुन्हे दाखल ः अकोला पोलिसांचे बारकाईने लक्ष

अकोला  कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर जे रुग्ण उपचाराकरिता दवाखान्यात जाण्यासाठी टाळाटाळ करतात किंवा रुग्णालयात भरती न होता नातेवाईकांकडे किंवा इतरत्र निघून जातात तसेच कोरोना पॉझिटिव रुग्णांच्या जवळच्या संपर्कात असणारे त्यांचे नातेवाईक तसेच मित्र व शेजारी यांना क्वारंटाइन सेंटरला इलाजासाठी जाणे अत्यावश्यक आहे. परंतु यासंदर्भातही काही नागरिक टाळाटाळ करतात. त्याअनुषंगाने उपचार घेण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या व क्वारंटाइन सेंटरला न जाणाऱ्या नागरिकांच्या विरोधात फौजदारी कारवाई करणे सुरू झाले आहे. तेव्हा आजाराची माहिती लपवत असाल तर तुमच्यावरही गुन्हे दाखल केले जाऊ शकतात.

जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. अशातच आपली थोडीशी बेफिकीरी अनेकांना संकटात नेऊ शकते. असे जरी असले तरी काही महाभाग आजाराची लक्षण असून, क्वाॅरंटाईन सेंटरला थांबत नाहीत तर रुग्णालयात जाण्यास टाळाटाळ करतात. हा सर्व प्रकार कोरोना विषाणूला फैलाव करण्यास कारणीभूत ठरू शकतो म्हणून अशांवर अकोला पोलिस विभागाकडून कारवाई करणे सुरू करण्यात आले आहे.

दोघांवर गुन्हे दाखल
आजाराची माहिती लपवणे किंवा रुग्णालयात जाण्यास टाळाटाळ करणाऱ्या खदान पोलिस ठाण्यांतर्गंत येणाऱ्या कच्ची खोली सिंधी कॅम्प येथील रहिवासी असणाऱ्या 36 वर्षीय पुरुष रुग्णावर तसेच खदान येथे राहणाऱ्या एका स्त्री रुग्णा विरुद्ध, भादवि कलम 269, 271, 188 सहकलम 3 साथरोग अधिनियम, सहकलम 51 बी आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, अशाप्रकारे टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांना विरुद्ध यापुढेही गुन्हे नोंद करण्यात येणार आहेत.

अकोल्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच काही जण रुग्णालयात जाण्यास टाळाटाळ करतात आणि क्वारंटाईन सेंटरला थांबत नाहीत. अशांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करणे सुरू करण्यात आले आहे. तेव्हा नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, लक्षणं असल्यास रुग्णालयात जावे.
-
किरण वानखडे, पोलिस निरीक्षक, खदान.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If you hide information about the disease, you will be charged