व्यापारउदीम लाॅक गुटखा, मात्र ‘अनलाॅक’

वेशीवर बंदोबस्तातून अभय; दररोज कोट्यवधींची उलाढाल
व्यापारउदीम लाॅक गुटखा, मात्र ‘अनलाॅक’

वाशीम ः कोरोनाने संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाउन सुरु झाले आहे. सर्व व्यवहार बंद असताना जिल्ह्यात गुटख्याचा व्यापार, मात्र तेजीत आला असून, लॉकडाउनचा फायदा घेत गुटखा माफीया अव्वाच्या-सव्वा दराने गुटख्याची विक्री करीत असल्याने या लॉकडाउनमध्ये अवैध गुटख्याचा व्यापार सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरला आहे. जिल्ह्यामध्ये सीमांवर, तसेच शहराबाहेर चौकी पहारे बसले असून, यामधून सुखरूपपणे गुटख्याची वाहने अवागमन करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. जिल्ह्यामध्ये दररोज किमान दोन कोटी रुपयांच्या गुटखा वाहतूक होत असून, ग्रामीण भागात दुकानदारांनी घरपोच करण्याचे जाळे गुटखा माफीयांनी विनले आहेत. अन्न व औषधी प्रशासन विभाग, मात्र याकडे सोईस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र समोर येत आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यामधे कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदी लावून जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे सगळेच वैध व्यवसाय बंद झाले आहेत, मात्र अवैध व्यवसायाला सोन्याचे दिवस आले असून, गुटखा माफीया दररोज कोट्यवंधीचा गुटखा जिल्ह्यात रीचवत असल्याचे चित्र आहे. सध्या जिल्ह्यात पानटपट्या बंद आहेत, तरीही ग्राहकांना मुबलक प्रमाणात गुटखा उपलब्ध करून दिल्या जातो. सायंकाळी व सकाळी पानटपरी जवळ गुटखा माफीयांचे पंटर हजर होतात किंवा पानटपरी चालकाच्या घरी जावून गुटखा दिला जातो. त्यानंतर त्या पानटपरी जवळ बसून पानटपरी चालक थैलीतील गुटख्याची विक्री करतो. दिवसभर विक्री होणारा गुटखा एक ते दोन तासात विकल्या जात असल्याने लॉकडाउनचा या व्यवसायावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे चित्र समोर येत आहे. लॉकडाउनचा फायदा घेत गुटखा माफीयांनी गुटख्याचे दर देखील वाढविले आहेत. पाच रुपयांची गुटखा पुडी सात ते दहा रुपयांना विकली जात असून, या व्यवहारामध्ये नफन्याचे प्रमाण प्रचंड असल्याने दररोज कोट्यवधींचा गुटखा राजरोजसपणे विकला जात आहे.

कारंजा मुख्य केंद्र

दोन महिण्यांपूर्वी पोलिस प्रशासनाने कारंजा येथील एका गोदामावर छापा टाकून लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला होता, मात्र तरीही याच कारंजा शहरातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये अजूनही गुटख्याचा पुरवठा केला जातो. कारंजावरून हा गुटखा एका वाहनातून कधी शेलुबाजार मार्गे, तर कधी मंगरुळपीर मार्गे वाशीम शहरात येतो. शहरातील जुन्या वस्तीमध्ये करूनेश्वर मंदिरा लगत एका घरामध्ये हा गुटखा साठविला जातो, तसेच काही गुटखा वाशीम-शेलुबाजार रोडवरील शेतात असलेल्या गोदामातही साठविला जातो. तेथून चारचाकीने गुटखा मालेगाव, रिसोड येथे पोहचविला जातो. अतिरिक्त राहिलेला गुटखा रिसोड तालुक्यातील एकागावात साठवून दुसऱ्या दिवशी त्याची विल्हेवाट लावली जाते. या दोन दिवसांच्या व्यवहरात कोट्यवधी रुपयांचा गुटखा खपविला जातो.

वाहतूक होतेच कशी?

सध्या लॉकडाउन असल्याने प्रत्येक शहराच्या वेशीवर प्रत्येक वाहन तपासले जाते, मात्र कारंजावरून निघालेला वाशीमच्या गुटखा माफीयांचा गुटखा शहरात राजरोसपणे येतोच कसा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रत्येक मार्गावर चौकी पहारे असताना, गुटख्याची वाहने जातातच कशी? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. जिल्ह्यामध्ये सध्या एका गुटखा कंपनीच्या गुटख्याची नक्कल केली जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचा आरोप होत आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागााचे कार्यालय सध्या अकोला येथे कार्यरत असून, जिल्ह्यात होणाऱ्या गुटख्याची राजारोस उलाढाल हेतूपरस्पर दुर्लक्षित होत असल्याचा आरोप होत आहे.

संपादन - विवेक मेतकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com