esakal | अभयारण्याकडे वळताहेत पाऊले

बोलून बातमी शोधा

अभयारण्याकडे वळताहेत पाऊले
अभयारण्याकडे वळताहेत पाऊले
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी वर्षभरापासून लोक घराबाहेर पडणे टाळत असून, पर्यटनावर त्याचा सर्वाधिक परिणाम दिसून आला आहे. आता मात्र पर्यटनाकडे प्रामुख्याने अभयारण्याकडे पर्यावरण प्रेमींची पाऊले वळत असून, सहकुटुंब जंगल सफारी करण्यावर तरुणाईचा जोर दिसून येत आहे.

कोविड १९ च्या प्रादुर्भावाने मार्च २०१९ पासून जनजीवन व आर्थिक व्यवस्था विस्कळीत झाली असून, जवळपास सर्वच क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला आहे. शासकीय, खासगी संस्था, उद्योग, वाहतूक क्षेत्र, नाट्यक्षेत्र, सिनेसृष्टी, हॉटेल्स, खानावळी या सह सर्वच क्षेत्रांना या काळात मोठा फटका बसला असून, पर्यायाने लोकजीवन विस्कळीत झाले आहे. लॉकडाउनमुळे लोकांना अत्यावश्‍यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडणे अडचणीचे झाल्याने लोकांना वर्षभरापासून घर किंवा स्वतःचे गाव एवढेच जग उरले आहे. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला होता. त्यामुळे लवकरच जनजीवन पूर्वस्थितीत येईल अशी अपेक्षा होती. परंतु, गेल्या महिन्यापासून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि पुन्हा लॉकडाउनला नागरिकांना सामोरे जाण्याची वेळ आली. मात्र आता कोरोनाला घाबरण्यापेक्षा योग्य ती काळजी घेऊन व कोविड १९ चे सर्व नियम पाळून लोकांनी बाहेर पडायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने तरुणाई व नोकरवर्गांचा समावेश आहे. या वर्गाकडून वनपर्यटनाला विशेष पसंती मिळत असून, सहकुटुंब लोक जंगलसफारीचा, वनपर्यटनाचा आस्वाद घेत आहेत.

वाघोबाच्या दर्शनाची ओढ

तरुणाईला तसेच बच्चेकंपनीलाही आता वाघोबा दर्शनाची ओढ लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहाणूर, ताडोबा, पेंच, टिपेश्‍वर अभयारण्यातील जंगलसफारी करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जात असून, वाघोबाचे फोटो काढून ते सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल करीत आहेत.

अकोला व वऱ्हाडातील निसर्गप्रेमी, वनप्रेमी, वन्यजीवप्रेमी, अभ्यासकांना सध्या वनपर्यटनासाठी काटेपूर्णा अभयारण्य, कांरजा सोहोळ अभयारण्य तसेच व्याघ्र दर्शन इच्छुकांसाठी शहाणूर उत्तम पर्याय आहे. काटेपूर्णा अभयारण्यात बोटिंगची सुविधा सुद्धा आहे. फॉरेस्टगाईड, जंगल सफारी, राहण्याची सुविधा सुद्धा वरील पर्यटनस्थळी आहे. कारंजा सोहोळ येथे सायक्लींगची सुविधा सुद्धा आहे. निसर्गप्रेमींनी कोविड संदर्भातील नियम पाळून व योग्य खबरदारी घेऊन येथील पर्यटनाचा आस्वाद अवश्‍य घ्यावा.

- डॉ. मिलींद शिरभाते, सदस्य, काटेपूर्णा तथा कारंजा सोहोळ अभयारण्य धोकाग्रस्थ अधिवास समिती