कोरोनामुळे नव्हे तर उपासमारीनेच मरण्याची वेळ!

It is time for businessmen to starve to death due to lack of employment.jpg
It is time for businessmen to starve to death due to lack of employment.jpg

तेल्हारा (अकोला) : रोजगार ठप्प झाल्याने कोरोनाने नव्हे तर उपासमारीने मरण्याची वेळ व्यावसायिकांवर येऊन ठेपल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तेल्हारा तालुका मंडप, बिछायत, डेकोरेशन, साऊंड, असोसिएशन आणि विवाह सेवा संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शांती मोर्चा आणि तहसील कार्यालय तेल्हारा येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

मार्च महिन्यापासूनच कोरोनाच्या प्रकोपामुळे सर्व प्रकारच्या विवाहसंबंधी तसेच मांगलिक, धार्मिक, सामाजिक, राजकीय सांस्कृतिक अशा सर्वच प्रकारच्या कार्यक्रमांवर शासनाचे अनेक निर्बंध असल्यामुळे मंडप, बिछायत, डेकोरेशन, साऊंड सर्व्हिस, केटरिंग, आचारी, वाजंत्री, बँड पार्टीवाले, बग्गीवाले, घोडेवाले, फ्लॉवर्स मंगल कार्यालय, इत्यादी सर्वच प्रकारचे व्यवसाय ठप्प झाले असून या सर्वांवरच उपासमारीची वेळ आलेली आहे. 

अनेकवेळा शासनास निवेदने देऊन आणि गाऱ्हाणे मांडून सुद्धा शासनाने यांच्या मागण्यांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. यामुळे  शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि व्यथा मांडण्यासाठी विवाह सेवा संघर्ष समिती आणि तेल्हारा तालुका मंडप बिछायत, डेकोरेशन साऊंड लाइटिंग असोसिएशन तेल्हारा रजि. नंबर 159/2020 यांच्या संयुक्त विद्यमाने सात ऑक्टोबर 2020 बुधवारी शासनाचे सर्व नियम पाळून मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत पोलीस स्टेशन ते तहसील कार्यालय तेल्हारापर्यंत शांती मोर्चा काढली. 

तसेच तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन अत्यंत शांततामय मार्गाने व कायदा हातात न घेता करण्यात आले. नंतर तहसीलदार साहेबांमार्फत शासनास निवेदन सादर करण्यात आले. शासनाने तात्काळ मागण्यांची दखल न घेतल्यास सर्वांवर आत्महत्येची वेळ येणार असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. सर्व प्रकारच्या कार्यक्रम आयोजनावरील निर्बंध तात्काळ उठवावेत. 
 
सन 2020 मध्ये ठप्प झालेल्या व्यवसायामुळे झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या नुकसानीची भरपाई शासनाने मदतीच्या स्वरूपात व्यवसायिकांना करावी. पूर्ण क्षमतेने व्यवसाय करण्याची मुभा शासनाने त्वरित द्यावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. सदर आंदोलनात बहुसंख्य मंडप, बिछायत, डेकोरेशन, साऊंड, लायटिंग, मंगल कार्यालय, केटरिंग, आचारी, फ्लॉवर्स, फोटोग्राफर्स, घोडेवाले, बग्गीवाले, बँड पार्टीवाले आणि मजूर वर्ग आणि सर्व संबंधित व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com