चिंताजनक : ‘ही’ तर गेल्या वर्षीच्या मोसमाचीच पुनरावृत्ती; शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर यंदाही...

अनुप ताले
Wednesday, 24 June 2020

गेल्या वर्षी उन्हाळा जोरदार तापला होता. त्यानुसार व मॉन्सूनच्या प्रवासाचा वेध लक्षात घेता, हवामान विभागाने जूनच्या पहिल्या आठवड्यातच विदर्भासह राज्यात मॉन्सूनचे आगमन होणार असल्याचे संकेत दिले होते.

अकोला : जूनच्या पहिल्या आठवड्यातच मॉन्सून धडकणार, खरिपासाठी यंदा मॉन्सून पोषक, असे सुखद विधान गेल्यावर्षी मे मध्ये हवामान विभागाने केले होते. मात्र प्रत्यक्ष मॉन्सूनचे आगमन झाले जुलैमध्ये! यंदाही हवामान विभागाने असेच भाकीत केले होते. परंतु, गेल्यावर्षीच्या मोसमाचीच पुनरावृत्ती जणू काही यंदा होत असून, त्यानुसारच मॉन्सूनच्या प्रवासाची दिशा लक्षात येत आहे.

गेल्या वर्षी उन्हाळा जोरदार तापला होता. त्यानुसार व मॉन्सूनच्या प्रवासाचा वेध लक्षात घेता, हवामान विभागाने जूनच्या पहिल्या आठवड्यातच विदर्भासह राज्यात मॉन्सूनचे आगमन होणार असल्याचे संकेत दिले होते. परंतु, वाऱ्याची दिशा, हवेचा दाब, आर्द्रतेमध्ये बदल घडून येऊन मॉन्सूनचे आगमन जवळपास महिनाभर लांबले. त्यामुळे खरिपाची पेरणीसुद्धा लांबली आणि पर्यायाने हंगामातील पिके सुद्धा उशिरा निघाली. या दरम्यान सुरुवातीला पावसाचा दीर्घ खंड आणि ऑगस्ट, सप्टेबर, ऑक्टोबर मध्ये पावसाने तडाखा लावल्याने अतिवृष्टी होऊन अख्खा खरीप उद्‍ध्वस्त झाला. 

यंदा मात्र जागतिक प्रदूषण नियंत्रणात झाल्याने विस्कटलेली ऋतूचक्राची घडी पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता दिसून येत होती. त्यामुळे यावर्षी सुद्धा जूनच्या पहिल्या आठवड्यातच मॉन्सूनचे जोरदार आगमन होणार असून, पर्जन्यमान सामान्य तथा खरिपाला पोषक ठरणार असल्याचे संकेत हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आले होते. परंतु, मध्यंतरी ‘ॲम्फन’ आणि ‘निसर्ग’ या दोन वादळांची समुद्रात निर्मिती झाल्याने, यंदाही मॉन्सून लांबला. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात दोन ते तीन दिवस काही भागात पावसाने हजेरी लावली मात्र ती मॉन्सूनपूर्व हजेरीच ठरली असून, अजूनही जोरदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम आहे.

दुबार, तिबार पेरणीचे संकट घातलतेय घिरट्या
जिल्ह्यात 23 जूनपर्यंत जरी 82.16 मि.मी. आणि वार्षिक सरासरीच्या 16.51 टक्के पाऊस पडला असला तरी, जवळपास आठवडाभरापासून पावसाने दांडी मारल्याने, झालेल्या पेरण्या उलटण्याच्या मार्गावर आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या आठवड्यातही पावसाचा लहरीपणा दिसू शकतो. त्यामुळे दुबार, तिबार पेरणीचे संकट यंदाही घिरट्या घालत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It's like repeating last year's monsoon season in akola district akola marathi news