esakal | घरफोडी, दानपेट्यां चोरणाऱ्या बालगुन्हेगारांचा छडा
sakal

बोलून बातमी शोधा

4Criminal_6.jpg

खदान पोलिसांची कारवाई ः चार लाखांचा मुद्देमाल जप्त

घरफोडी, दानपेट्यां चोरणाऱ्या बालगुन्हेगारांचा छडा

sakal_logo
By
भगवान वानखेडे

अकोला ः अमरावती बुलडाण्यासह अकोला जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतर्गंत घरफोडी, दानपेटी फोडून दुचाकी चोरी करणाऱ्या तीन बाल गुन्हेगारांचा खदान पोलिसांनी छडा लावला असून, या विधी संघर्ष बालकांची बालसुधारगृहात रवानही केली आहे. तर या बालगुन्हेगारांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी तब्बल चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

काही दिवसापूर्वी खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फिर्यादी प्रशांत हिरांसिंग जाधव यांची बहीण रेखा दुर्योधन चव्हान यांच्या खडकी येथील घरी चोरी झाली होती. त्यामध्ये 2 लाख 87 हजाराचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी खदान पोलिसांनी तपास सुरू केला असता पोलिस कर्मचारी डिगांबर अरखराव, राजेंद्र तेलगोटे, रविराज डाबेराव, शैलेश जाधव हे पेट्रोलिंग करीत असताना दोन अल्पवयीन मुले परिसरात संशयितरित्या फिरताना दिसून आले. तर याच दरम्यान गजानन मंदिरामधील सीसीटीव्ही फुटेज पाहले असता त्यामध्ये तीच दोन मुले दिसून आले. यावरून एसडीपीओ यांना माहिती देऊन या मुलांचा शोध घेणे सुरू झाले. ते दोन्ही अल्पवयीन मुलांची डीबी पथकाने विश्वासाने विचारपूस केली असता चोरीतील मुद्देमाल त्यांचा मित्र सुलतानकडे असल्याचे सांगितले. यातील तिसरा बालगुन्हेगार सुलतान यालाही खदान पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. या तिन्ही बालगुन्हेगांरानी गुन्ह्याची कबुली दिली असून, या बालगुन्हेगारांकडून टिव्ही, होम थिएटर, दुचाकी, सोन्याच्या बांगड्या, सायकली असा चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

घरफोडी, चोरीचे सात गुन्हे दाखल
खदान पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने अटक केलेल्या तीन बालगुन्हेगारांवर अकोला, अमरावती, बुलडाणा, मूर्तिजापूर, एमआयडीसी,  यासह इतर पोलिस ठाण्यात एकुण सात गुन्हे दाखल आहेत. आर्थिक लाभासाठी घरांची रेखी करून नंतर चोरी करणाऱ्या या बालगुन्हेगारी टोळीचा खदान पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने छडा लावला आहे. 

सोने तर चोरायचेच सोबत पावत्याही पळवायचे
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरी, घरफोडी करणारे हे बालगुन्हेगार चोरीमध्ये ऐवढे माहिर झाले होते की, चोरी करताना रोख रकमेंसह सोने-चांदीचे साहित्य चोरत असताना त्या दागिन्यांच्या पावत्याही पळवायचे. चोरलेले हे साहित्य जुने शहरातील 50 वर्षीय नसीमा बी मालक महिलेजवळ ठेवायचे. ती महिली सोनाराकडे जाऊन पावती दाखवून ते चोरीचे दागिने विकत असे. त्या महिलेलाही अटक केली असून, ती सध्या पोलिस कोठडीत आहे.