Akola : विधान परिषद निवडणूक : भाजपने टाळले; शिवसेनेचे शक्ती प्रदर्शन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shivsena bjp

विधान परिषद निवडणूक : भाजपने टाळले; शिवसेनेचे शक्ती प्रदर्शन!

अकोला : विधान परिषदेच्या अकोला, बुलडाणा, वाशीम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघसाठी महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांसोबत शक्ती प्रदर्शन करीत सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात मोजक्या पदाधिकाऱ्यांसोबत पोहोचत भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी उमेदवार अर्ज दाखल करताना शक्ती प्रदर्शन टाळले.

अकोला-बुलडाणा-वाशीम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतर्फे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांची शिवसेनेतर्फे उमेदवारी कायम ठेवली. सन २०१५ मध्ये शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढविली होती. यावेळी मात्र हे दोन्ही मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात विधान परिषदेची निवडणूक लढवित आहे.

विशेष म्हणजे, एकेकाळचे मित्र पक्षांनी यावेळी उमेदवारीही दोन बालमित्रांनाच दिली आहे. विद्यमान आमदार बाजोरिया यांच्या विरोधात भाजपचे वंसत खंडेलवाल यांची उमेदवारी जाहीर झाल्याने या मतदारसंघातील चूरस वाढली आहे. त्याचा प्रयत्य शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार बाजोरिया यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनातून आला.

सोमवारी आमदार बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खासदार अरविंद सावंत खास मुंबईहून आले होते. अन्न व औषध प्रशासन मंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे, त्यांच्यासोबत बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी, आमदार विप्लव बाजोरिया, बुलडाणा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, मनपा विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुधारकर खुमकर, युवा सेनेचे विठ्ठल सरप, शिवसेनेचे पदाधिकारी, काँग्रेसचे नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यापूर्वी भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा वसंत खंडेलवाल यांच्यासोबत मोजके पदाधिकारी होते. शक्ती प्रदर्शन टाळून आमदार डाॅ. संजय कुटे यांच्या सह आमदार रणधीर सावरकर, माहपौर अर्जना मसने, जयंत मसने, माजी आमदार चैनसुख संचेती या मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित अर्ज दाखल केला.

जमावबंदीचा विसर

संपूर्ण जिल्ह्यात कलम १४४ नुसार जमावबंदी आदेश जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी लागू केला आहे. विधान परिषदेच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करताना मोजक्या लोकांना सोबत नेण्याची परवानी होती. महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासोबत शेकडोच्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयत दाखल झाले होते. जिल्हात सुरू असलेल्या जमावबंदीचा आदेश झुगारून जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी झाल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.

आमदारांचा पोलिसांसोबत वाद

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मोजक्या लोकांसोबत उमेदवारांना जाण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, आमदार बाजोरिया यांच्यासोबत असलेले महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, आमदार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोहोचल्याने पोलिसांनी उमेदवारासोबत जाणाऱ्यांना थांबवून धरले. त्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी व बुलडाण्याचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांचाही समावेश होता. त्यामुळे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी बाहेर येत पोलिसांना जाब विचारला. त्यातून शाब्दिक वाद वाढत गेला. अखेर पोलिसांनी परिस्थिती हाताळत वाद मिटविला व दोन्ही पदाधिकाऱ्यांना आत सोडले.

loading image
go to top