‘मोल’ नसल्याने यंदा लिंबूची ‘माती’; ५० रुपयाला कट्टं 

अनुप ताले
Thursday, 13 August 2020

जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेरूनही लिंबूची मागणी अधिक असल्याने व जिल्ह्यात लिंबू पिकाला पोषक वातावरण असल्याने दरवर्षी लिंबूचे क्षेत्र वाढत आहे. सरासरी उत्पादन क्षेत्र लक्षात घेता अकोला जिल्ह्यात जवळपास २३५० हेक्टरवर लिंबूचे पीक घेतले जाते. त्यातून १२ ते १४ टन प्रतिहेक्टर लिंबू उत्पादन होते. ऑक्टोबर, नोव्हेंबर २०१९ च्या वेळी जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस व अतिवृष्टीने थैमान घातल्याने हस्तबहारच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्याचा परिणाम होऊन यावर्षी लिंबुच्या उत्पादनातही मोठी घट झाली असून, हेक्टरी सहा ते सात टन उत्पादन मिळत आहे. असे असले तरी भावात मोठी घसरण दिसून येत आहे.

अकोला : गेल्यावर्षी अवकाळी पावसामुळे हस्तबहाराचे नुकसान होऊन पिकाला मोठा फटका बसला आणि आता भाव तळाशी गेल्याने तोडणीचाही खर्च काढणे शक्य राहाले नाही. त्यामुळे मानवी आरोग्यासाठी वरदान मानले जाणारे लिंबू शेतातच पडून सडत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे तर, भरमसाट खर्च करून हाती काहीच न लागल्याने लिंबू उत्पादकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. 
 

जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेरूनही लिंबूची मागणी अधिक असल्याने व जिल्ह्यात लिंबू पिकाला पोषक वातावरण असल्याने दरवर्षी लिंबूचे क्षेत्र वाढत आहे. सरासरी उत्पादन क्षेत्र लक्षात घेता अकोला जिल्ह्यात जवळपास २३५० हेक्टरवर लिंबूचे पीक घेतले जाते. त्यातून १२ ते १४ टन प्रतिहेक्टर लिंबू उत्पादन होते. ऑक्टोबर, नोव्हेंबर २०१९ च्या वेळी जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस व अतिवृष्टीने थैमान घातल्याने हस्तबहारच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्याचा परिणाम होऊन यावर्षी लिंबुच्या उत्पादनातही मोठी घट झाली असून, हेक्टरी सहा ते सात टन उत्पादन मिळत आहे. असे असले तरी भावात मोठी घसरण दिसून येत आहे. सध्या ५० ते ६० प्रतिकट्टे (१५ किलो) भाव मिळत असून, त्यासाठी लागणारा तोडणी व वाहतूक खर्चही शेतकऱ्यांना काढणे होऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तोडणी करण्यापेक्षा व लिंबू बाजारात विक्रीसाठी नेल्यापेक्षा शेतातच पडू देण्याचा निश्‍चय केल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यात बहुतांश भागात लिंबू उत्पादन शेतातच पडून सडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

 

वाडेगाव परिसरात मोठे फटका 
जिल्ह्यातील लिंबू उत्पादनासाठी बाळापूर तालुक्यातील वाडेगावची शेती प्रसिद्ध आहे. येथून बाहेर देशातही लिंबू निर्यात केले जाते. यंदा मात्र लिंबुचे भाव तळाशी गेले असून, त्यासाठी येणारा मजुरी खर्चही काढणे शेतकऱ्यांना शक्य राहाले नाही. त्यामुळे येथील लिंंबू उत्पादकांना सर्वाधिक फटका बसला असून, शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

 

यामुळे उत्पादनात घट
जिल्ह्यात लिंबू लागवड क्षेत्र व पर्यायाने उत्पादन दरवर्षी वाढत आहे. मात्र दिवाळीच्या कालावधीत पावसामुळे हस्तबहाराचे मोठे नुकसान झाले होते. त्याचा परिणाम सध्या उत्पादनावर झाला आहे तर, अचानक झालेली भावातील घसरण, यामुळे लिंबू उत्पादनाला सध्या मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. 
- गजानन तुपकर, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र अकोला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lemons are rotting in the field