
अकोला : महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात फक्त शनिवारी व रविवारी लॉकडाउन केले असून, इतर दिवशी ‘ब्रेक दी चेन’ साठी काही निर्बंध घातले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत आणखीही काही घटकांचा समावेश केलेला आहे. या निर्बंधांच्या शासन निर्णयात विशेष बाब म्हणजे स्थानिक परिस्थिती पाहून स्थानिक जिल्हाधिकारी, प्रशासनाला स्थानिक बाबतीत निर्णय घेण्याचे स्वतंत्र अधिकार दिले आहे.
इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोला जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे नवीन आलेल्या जीवनावश्यक बाबींच्या यादीतील वापराशिवाय सुद्धा अनेक दुकाने उघडण्याची परवानगी नाशिकच्या धर्तीवर शिस्तबद्ध व वेगवेगळ्या वेळेवर देण्याची मागणी अकोला जिल्हा काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे.
कोरोना ही न संपणारी प्रक्रिया असून, आज निगेटिव्ह आलेला व्यक्ती उद्या पॉझिटिव्ह येऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा स्पष्ट केले की कोरोना बरोबर जगावे लागेल. एक वर्षांपासून सर्व छोटे व्यवसाय बंद आहेत. आजही अकोला जिल्ह्यात अनेक कुटुंब अशी आहेत की घरात एक व्यक्ती कमावता आहे आणि बाकीचे त्याच्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे लॉकडाऊन केल्यास त्या व्यक्तीचा रोजगार बंद झाला तर त्यांनी जगायचे कसे? आपण जिल्ह्याचे कुटुंबप्रमुख असल्याने सहानुभूतीपूर्वक विचार करून लॉकडाउन रद्द करा. अन्यथा त्यांच्या जगण्याची सोय करण्यासाठी त्यांच्या खात्यात दरमहा किमान पाच हजार रुपये टाका व त्यानंतरच लॉकडाउन करा, अशीही मागणी अकोला जिल्हा काँग्रेस पक्षाकडून केली आहे.
पूर्वीच्या रुग्ण संख्येत व आताच्या रुग्ण संख्येतील फरक पाहता अकोला जिल्ह्यातील लॉकडाउन रद्द करून गोरगरीब जनतेला दिलासा देणे गरजेचे आहे. कारण शासनाने जाहीर केलेल्या आदेशात अत्यावश्यक सेवेत केवळ मेडिकल व किराणा दुकान सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु दररोज मोलमजुरी करून हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीबाचा या लॉकडाउनमुळे रोजगार हिरावला असल्याने तो कमाई करणार कधी आणि किराणा खरेदी करणार कधी? असा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे इतर आस्थापने सुरु करून गोरगरीबांना रोजगार उपलब्ध करून दिलासा देणे आवश्यक आहे.
.............
अतिक्रमण निर्मुलन मोहीम थांबवा
अकोला महानगरपालिका प्रशासनाकडून लॉकडाउन काळात सुद्धा अतिक्रमणाची धडक मोहीम राबविण्यात येत असून, जिल्हाधिकारी महोदय आपण गोरगरिबांच्या उदरनिर्वाहाच सहानुभूतीपूर्वक विचार करून मनपा प्रशासनाला सदरची मोहीम तातडीने थांबण्याचे निर्देश देण्यात यावे. जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन व मनपा प्रशासनाच्या समन्वयाने जिल्ह्यात टेस्टिंग वाढविणे, बाजारात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या तोंडावर मास्क आहे किंवा नाही, नसल्यास त्यांचेवर दंडात्मक कार्यवाही करणे, घरोघरी जावून गंभीर आजार असलेल्या रुग्णांची विचारपूस करणे व संपूर्ण जिल्ह्यातील नागरीकांना लसीकरणात सहभागी करून घ्यावे. या प्रकारच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करून सदरचे मिनी लॉकडाउन रद्द करून गोरगरिबांना रोजगारासाठी दिलासा देण्याची मागणी अकोला जिल्हा काँग्रेस पक्षाकडून जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
(संपादन - विवेक मेतकर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.